पुणे-गत काही दिवसांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने वादात अडकत आहेत. यामुळे बेजार झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे . तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. उगीच कुठेही, किंवा चौफुल्यावर जाऊन ठाँय ठाँय करू नका,ढगात गोळ्या मारू नका असे ते हाताने बंदुकीचा इशारा करत म्हणालेत.
राष्ट्रवादी–महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करत सर्वांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालणारा, सर्वसमावेशक हिताचं भान जपणारा पक्ष आहे. आम्ही काम करताना कोणताही जात-पंथ-धर्माचा भेदभाव करत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका जोपासायची आहे.आपलं राष्ट्रवादी-महायुती सरकार राज्यातील तमाम जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. राज्यात सर्व पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक योजनांची अंमलबजावणी आणि आधुनिकतेची जोड या साऱ्यांमधून आपण शाश्वत महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावलं टाकत आहोत. या प्रवासात आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग राहावा व महाराष्ट्र हिताचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडावं, हीच अपेक्षा आहे.
भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने चौफुला येथील एका कलाकेंद्रात गोळीबार केला होता. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा या प्रकरणाचा दाखला देत आमदार शंकर मांडेकर यांच्यासह वादात सापडणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
चौफुल्याला जाऊन तरफडू नका.कुठेही जाऊन ठाँय ठाँय करू नका. ढगात गोळ्या मारू नका. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी झाले आहात. काहीजण सहकारी झालेत. त्यामुळे आता तुमच्याकडून कधीही, कुठेही चूक होऊ देऊ नका. अशाने संबंधित व्यक्तीची आणि तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचीही बदनामी होते. हे अजिबात चालणार नाही, असे अजित पवार शुक्रवारी सकाळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावेळी त्यांच्या बाजूलाच आमदार मांडेकर बसले होते. अजित पवारांचे हे बोल ऐकूण ते वरमल्यासारखे झाले.
अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावरही भाष्य केले. काही जणांनी आपल्या सुनांना कशा प्रकारे त्रास दिला? त्यांनी आम्हाला लग्नाला बोलावले. त्यामुळे आम्ही लग्नाला गेलो. त्यात आमचा काही दोष आहे का? आम्ही त्यांना त्यांच्या सुनेला त्रास द्यायला सांगितले का? उद्या सरपंचाच्या घरी लग्न असेल आणि आम्हाला त्याचे निमंत्रण असेल तर आम्ही तिकडेही जाणार. पण उद्या काय दिवा लागणार हे आम्हाला कसे कळणार? आम्हाला माहिती असते तर आम्ही गेलोच नसतो. लक्षात ठेवा. आपापसात सलोखा ठेवा, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी यावेळी केलेल्या हाताच्या अॅक्शननंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील विवाहित वैष्णवी हगवणे हिचा दोन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. वैष्णवीला लग्नात फॉर्च्यूनर कार, 51 तोळे सोने, चांदीची भांडी दिली होती. त्यानंतरही हुंड्यासाठी तिचा छळ होत होता, असा तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे. त्यांच्या मते, तिच्या सासरच्यांनी जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने वैष्णवीचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीचे सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते.

