खड्ड्यात दुचाकी घसरली अन् वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे- महापालिकेचे लाडके खाते असलेल्या पथ विभागाने बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकात केलेले रस्त्याचे काम आणि तिथे गेलेले बळी सर्वांना ठाऊक आहेतच , रस्तोरस्ती पडलेले खड्डे ,पडलेली वाळू, रस्त्यांच्या दुरावस्थेने पुणेकरांनी कमावलेली पाठीची, कंबरेची दुरवस्था हे सारे वर्षानुवर्षे पाहत असलेले पुणेकर एवढे सोशिक कि आपले जीव गमवतात पण महापालिकेच्या पथ विभागाची कधी कॉलर पकडून जाब विचारत नाहीत .अशाच महापालिकेच्या भाग्यवान पथ विभागाने आज आणखी एका वृद्धाचा बळी घेतला आहे. त्याचे असे झाले ,
खड्ड्यांमुळे गाडी स्लीप झाली आणि चालक मागून आलेल्या कारच्या चाकाखाली आला. यामध्ये 61 वर्षीय वृद्ध जगन्नाथ काळे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात औंधमधील गजबजलेल्या राहुल हॉटेलजवळ घडला.जगन्नाथ काळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडी स्लीप झाली त्यामुळे ते तोल जाऊन रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे.
आंधळी प्रजा ..अधांतरी दरबार … प्रशासका अजब तुझे सरकार …
रस्तोरस्ती चांगले रस्ते उखडायचे, पुन्हा पुन्हा कॉंक्रीटच्या नावाखाली करायचे ,इस्टीमेट म्हणजे पूर्वगणन पत्रक घोटाळा नंतर टेंडर घोटाळा, नंतर टक्केवारी हेही पाहत आलेले पुणेकर बिच्चारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना साहेब साहेब करतच डोक्यावर घेतात आणि असे रस्त्यावर मृत्युमुखी पडतात असे चित्र वारंवार दिसून आले आहे. फार तर एखाद्या कोर्टात एखादी केस कोणी केली तर कोर्ट हि महापालिकेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश देते अन .. अन काय ती लोकांनी भरलेल्या कारच्या पैशाच्या तिजोरीतूनच दिली जाते. ..

