मुंबई- भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासारखे बहुप्रतिष्ठित संशयित आरोपी, तब्बल १७ वर्षांची प्रतीक्षा आणि एक लाखाहून कागदपत्रांची तपासणी यामुळे लक्षवेधी ठरलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची अंतिम सुनावणी आज गुरुवारी (३१ जुलै) होत आहे. त्यामुळे त्याचा निकाल जाहीर हाेणार का? आणि साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पुराेहित यांना शिक्षा हाेणार की त्यांची निर्दाेष सुटका हाेणार, या निकालाची प्रतीक्षा आहे.
७-११ मुंबई बाॅम्बस्फाेट खटल्यातील १२ आराेपी निर्दाेष ठरल्यानंतर आता मालेगाव स्फाेटाच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयात कोर्टाचे विशेष न्यायाधीश अभय लाहोटी यांना या खटल्याच्या दस्तएेवजात १० हजार पानांचे परिशिष्ट आणि १ लाख पानांचे दस्त दाखल झालेले असल्याने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्याचीही मुदत गुरुवारी संपत आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ६ जण ठार, शंभरहून अधिक जखमी झाले होते. महाराष्ट्र एटीएसचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे यांच्या टीमने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्येय यांच्यासह अभिनव भारत संस्थेचे पदाधिकारी, काही साधू-महंतांना अटक केल्याने त्या वेळी ‘हिंदू दहशतवाद’ ही संज्ञा पुढे आली होती.

