मुंबई, दि. 30 : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालचे रहिवाशाना हलविणे आवश्यक आहे. जे रहिवाशी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत, त्यांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारिकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव
डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. तर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले की, स्मारक विस्तारिकरणाच्या भूसंपादन कामासाठी राज्य शासनाने 200 कोटींचा निधी दिला आहे. मात्र अद्याप भू संपादनाची कामं सुरु झाली नाहीत. स्मारकासभोवतालच्या सुमारे एक हजार राहिवाशांना अन्यत्र स्थलांतरीत करण्यासाठी पर्याय दिले आहेत. त्यातील 200 रहिवाशी पर्यायी ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांना तिकडून स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. इतर रहिवाशांना टप्प्या टप्प्याने हलविण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या 15 दिवसात भू संपादनची प्रक्रिया सुरु करावी.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, आतापर्यंत स्मारकाच्या विस्तारिकरणाची कामे सुरु व्हायला हवी होती. मात्र अद्याप सभोवतलच्या रहिवाशांचे स्थलांतर सुरु झाले नाही. सर्वांना एकाच वेळी हलविण्यापेक्षा जे नागरिक तेथून पर्यायी जागेच्या ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांना प्रथम हलविण्यात यावे व त्यांच्या जागा खाली कराव्यात. त्यानंतर इतरांना स्थलांतर करावे.
पुणे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर यांनी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

