भारतीय छात्र संसदेचे पाचवे सत्र संपन्न
पुणे – दि. १२ जानेवारी – भारतीय समाज अनेक जातींमध्ये विभागला आहे. हे वास्तव स्वीकारून, प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा, या हेतून जातगणना आवश्यक आहे. जातींची संख्यात्मक आकडेवारी समोर आल्याशिवाय समाजातील मागासलेल्या, वंचित घटकांचे नेमके चित्र समोर येणे अवघड आहे, असे मत काँग्रेस पक्षाचे जमशेदपूर येथील माजी खासदार डॉ. अजॉय कुमार यांनी मांडले
एमआयटीच्या भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात ते बोलत होते. डाटा, डायव्हर्सिटी अँड डेमॉक्रसी – कास्ट सेन्सस डायलेमा असा चर्चासत्राचा विषय होता.
डॉ. अजॉय कुमार म्हणाले, ’आधुनिक शैलीचे जीवन जगणारी शहरे वगळता गावात, खेड्यात गेले, की तुम्हाला आधी जात समजते. विशिष्ट जातींना सामाजिक सुविधा, हक्क, अधिकारांपासून कायम वंचित ठेवले जाते. जातींमध्ये विभागलेल्या समाजामुळे आपल्या देशातील ७५ टक्के संपत्तीचा उपभोग अवघे १० टक्के लोक घेतात, हे वास्तव आहे. या वास्तवाची विदारकता समजून घ्यायची असेल, तर जातगणनेची आवश्यकता आहे. नेमकी आकडेवारी समोर आली, की समस्येचे नेमके स्वरूपही समजण्यास मदत होते. जातींची गणना हा समाजाचा एक्सरे असतो’.
डॉ. संजय कुमार म्हणाले, ’आपल्या देशात जातींची इतकी विविधता आहे, की आकडेवारी (डेटा) मिळणे, आवश्यक आहे. डेटा समोर आला, की विविधतेचे स्वरूपही पुढे येते. विविध जातींचे समाजसमूह नेमक्या किती संख्येने आहेत, हे चित्र पुढे आले, की थर्मामीटर प्रमाणे नेमके तापमान समजणे सोयीचे होते. कुठल्याही योजना कार्यान्वित होतात, त्या आकडेवारीच्या जोरावर. त्यामुळे जातींचे वास्तव मान्य करून जातगणना करणे आवश्यक आहे. विविधतेचा आदर करण्यासाठीही विविधतेची आकडेवारी पुढे आली पाहिजे. त्यातून सामाजिक विषमतेचे स्वरूपही समजून घेणे सोपे जाईल’.
प्रा. मनोजकुमार झा म्हणाले, ’आपल्या समाजाची मानसिकता वेगळी आहे. आपल्याला सतत कुणीतरी जादूगार लागतो, जो आपल्या समस्यांची सोडवणूक करेल. साधनसामग्रीची अनुपलब्धता विशिष्ट समाजांना मागास ठेवते, हे वास्तव आहे. लोकशाही समाजव्यवस्थेत असे घडावे, ही कोंडी विचित्र आहे. जातगणना आवश्यक आहे, असे माझे मत आहे. अशी गणना केल्याने जातीयवाद वाढेल, असे मला वाटत नाही. लोकशाहीचे सामाजिकीकरण होण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी जातगणना पूरक ठरेल’.
यावेळी आदर्श युवा विधायक सन्मान झारखंडच्या आमदार पूर्णिमा नीरज सिंग यांना एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अनुराग शुक्ला, क्षितिज नाईक, सौरभसिंग जरीयाल, आकाश सपकाळे आणि विधान मलिक या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अक्षय मल्होत्रा यांनी आभार मानले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
वंचितांची नेमकी संख्या समजावी यासाठी जातगणना आवश्यक-डॉ. अजॉय कुमार
Date:

