नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी बांधल्या होत्या. याप्रकरणात महापालिकेचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती.येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा पाठपुरावा करून चौकशी करत होती. 14 मे रोजी ईडीच्या पथकाने वसई विरार शहरासह 13 ठिकाणी एकाच वेळी छापे मारून चौकशी सुरू केली होती.याच दरम्यान वसई विरार महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या मूळ हैद्राबाद येथील निवासस्थानी ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. या कारवाई रेड्डी यांच्या घरात सुमारे 8 कोटी 6 लाख रुपयांची रुपयांची रोख रक्कम आणि 23 कोटी 25 लाख रुपयांचे हिरे जडीत दागिने आणि सोने जप्त करण्यात आले.
मुंबई,-मुंबई, नाशिक आणि वसई-विरार शहरांमध्ये मंगळवारी सकाळी सक्त वसुली संचालनालयाने (ED) एकाचवेळी मोठी कारवाई केली. अवैध बांधकामाशी संबंधित प्रकरणात एकूण 12 ठिकाणी छापे मारी करण्यात आली असून, यामध्ये वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई तील निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली अंमलबजावणी संचालनालयची (ईडी) चौकशी तब्बल 18 तासांनंतर पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसले तरी, निवासस्थानातून अनेक महत्वाची कागदपत्रे, हार्ड डिस्कमधील मोठ्या प्रमाणातील डिजिटल डाटा हस्तगत केला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.वसईच्या दीनदयाल येथील पालिकेच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दरवाजा उघडण्यास विलंब केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल 1तास 15 मिनिटे बाहेर वाट बघावी लागली, त्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव टाळे खोलण्यासाठी दुसरी चावी बनवणाऱ्या कारागिराला बोलवावे लागले त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गृहात प्रवेश केला.कारवाई सुरू असताना माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नीला देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून दुपारी दोनच्या सुमारास गाडीतून बाहेर नेले होते. त्यानंतर त्यांना रात्री 9च्या सुमारास शासकीय निवासस्थानी परत आणण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईचा वेग वाढला होता. दोन प्रिंटर देखील कारवाईदरम्यान आणण्यात आले होते. तर संगणक तपशील जाम करण्यासाठी तीन हार्डडिस्क (संगणक संचयन यंत्र) ताब्यात घेण्यात आले होते.वसई विरार शहर महानगर पालिकेच्या माजी आयुक्तांची मंगळवारी सकाळी सुरू झालेली चौकशी अखेर बुधवारी दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पूर्ण झाली त्यानंतर रात्री दोन वाजता ईडीचे अधिकारी निवासस्थानातून बाहेर पडले होते. या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
विशेष बाब म्हणजे, अनिल कुमार पवार यांनी सोमवारीच आयुक्तपदाचा पदभार सोडून तो मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ईडीने ही धडक कारवाई केली. अनिल कुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील डंपिंग ग्राउंड साठी आरक्षित असलेल्या 60 एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या 41 इमारती उभारण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंगच्या संशयावरून ही छापे मारी करण्यात येत आहे.या आधीही ईडीने याच प्रकरणात 13 ठिकाणी छापे टाकून सुमारे 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्या वेळी काही बिल्डर, आर्किटेक्ट आणि तत्कालीन अधिकारी वाय.एस. रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.
सध्या ईडीचे पथक अनिल कुमार पवार यांच्या दीनदयाल नगर येथील घरात कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा पूर्व भागातील बेकायदेशीर इमारतींवरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा संशय ईडीला आहे.ईडीच्या या कारवाईमुळे वसई-विरार महापालिकेत आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

