मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हे दोन्ही नेते सध्या नाराजी, तीव्र नाराजी व अतितीव्र नाराजीच व्यक्त करताना दिसतात, असे ते म्हणालेत.
महायुती सरकार गत काही महिन्यांपासून आपल्या नेत्यांच्या व मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने वादात अडकत आहे. सुरूवातीला मंत्री नीतेश राणे यांनी वादग्रस्त विधाने करून सरकारला अडचणीत आणले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जय गुजरात म्हणून सरकारच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर शिंदेंच्याच नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून आपला हात साफ करून घेतला. हे कमी की काय म्हणून त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओत संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेसोबत बसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यामुळे सरकारचा पुरता गोंधळ उडवला. हा वादाचा क्रम इथेच थांबला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने विधिमंडळाच्या लॉबीतच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला. यावरूनही सरकारला सध्या रोज टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या यापूर्वीच्या काही विधानांमुळेही सरकारची चांगलीच गोची झाली होती.
या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याचा दावा केला आहे. राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात, असे दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांनी हे ट्विट फडणवीस व अजित पवारांनाही टॅग केले आहे.

