अखिल मंडई मंडळात महामृत्युंजय याग; भाविकांच्या वतीने लक्ष बिल्वपत्र अर्पण
पुणे: ॐ त्र्यंबकं यजामहे…’ च्या मंत्रघोषात अखिल मंडई मंडळाच्या वतीने आयोजित महामृत्युंजय याग अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. श्री शारदा गजानन मंदिर, महात्मा फुले मंडई येथे मंत्रोच्चार, हवन व धार्मिक विधी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर दुपारी लक्ष बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. यामध्ये महिला, पुरुष आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, तुषार शिंदे, चेतन वाघमळे उपस्थित होते. राजेश कराळे यांनी सपत्निक पूजा केली.
अण्णा थोरात म्हणाले, जीवनातील व्याधी, संकटे आणि मृत्यूचे भय दूर व्हावे, तसेच आरोग्य, चैतन्य व शांती लाभावी, या उद्देशाने मंडळाने यागाचे आयोजन केले होते. महामृत्युंजय यागाच्या माध्यमातून पुणेकरांनी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा अनुभव घेतला. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण होते.

