धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन
पुणे: “आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासात हुशार असणे पुरेसे नाही. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या सशक्त असणे, करिअरबाबत स्पष्टता असणे आणि तणावावर प्रभावी नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, बदलत्या काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. यासाठी योग्य मार्गदर्शन, वेळेचे नियोजन आणि भावनिक समतोल या गोष्टींचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात झाला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. कोहिनकर बोलत होते. संस्थेच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात ‘यशाचा सन्मान, भविष्यासाठी दिशा’ संकल्पनेवर झालेल्या कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, संस्थेचे सल्लागार विद्यासागर सर, संचालक अनिकेत चव्हाण, संदीप चव्हाण, सीए हर्षदा अनिकेत चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहगड रोड परिसरातील जवळपास ३० शाळांमधील दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.
अनिकेत चव्हाण म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे फक्त यशाचे कौतुक नाही, तर त्यांच्या विचारांना दिशा देणे, निर्णयांमध्ये स्पष्टता आणणे आणि पुढच्या वाटचालीसाठी योग्य दिशा देणे ही खरी आपली जबाबदारी आहे. अशा उपक्रमांतून शिक्षण संस्था ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, जीवन घडवणारी कार्यशाळा बनते,अशी माझी भूमिका आणि दिशा आहे.”
“दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकाल मिळवला याचा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही समाज आणि संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ गुणवंतांचा सत्कार न करता, त्यांच्यात मानसिक स्थैर्य, करिअरविषयी स्पष्टता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागचा खरा उद्देश आहे.”
– काकासाहेब चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

