Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अण्णाभाऊंचा ‘फकिरा’  आमच्या घरी!

Date:

लेखक: आचार्य रतनलाल सोनग्रा

१९६४ साल असेल, अण्णा भाऊ साठेंच्या ‘फकिरा’ च्या कादंबरीवर चित्रपट निर्मिती होत होती. ‘फकिरा’ च्या झुंजार जीवनावर चित्रपट काढायचा होता. चित्रपटासाठी लागणारं वेगवान कथानक त्यात होतं. स्वत: अण्णाभाऊ साठे आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक लेखक के. ए. अब्बास = (ज्यांनी राज कपूरच्या आवारा, बूटपॉलीश, मेरा नाम जोकर इ. बहुतेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या) यांनी ‘फकिरा’ ची पटकथा तयार केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी घेण्यात येत होते.

नगर जिल्हा तसा साम्यवादी चळवळीत फार आघाडीवर होता. राजकीय कार्यकर्त्यांची एक संपूर्ण तरूण पिढी साम्यवादी विचारांनी भारावलेली हेाती. राहुरीचे कडू पाटील, शेवगाचे एकनाथ भागवत, पाथर्डीचे बाबुजी आव्हाड, लक्ष्मण पालवे, श्रीरामपूरचे अण्णासाहेब शिंदे – नगरचे चंद्रभान आठरे पाटील, पारनेरचे भास्करराव औटी, नेवाश्याचे वकिलराव लंघे, नगरचे बाळासाहेब नागवले किती नावे घ्यावीत.

डॉ. श्रीराम रानडे हे अहमदनगरचे लोभस आणि सर्व पुरोगामी चळवळींना आणि कार्यकर्त्यांना सदैव मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व ! एका अर्थाने ‘नगरचे नेहरू’ च होते.‘फकिरा’च्या सर्व कलाकारांचा मुक्काम त्यांच्या एैसपैस घरात होता… अर्थात कलावंतांना आपापल्या सोयीचे हॉटेल होतेच. पण डॉक्टरांना भेटल्यावरच, त्यांच्याशी चर्चा केल्यावरच सर्व पाने हलायची. अण्णाभाऊ साठे मला तिथेच भेटले. त्यांनी ‘फकिरा’ ची एक प्रत स्वहस्ताक्षरात  ‘सप्रेम भेट’ लिहून मला दिली. अण्णाभाऊंचं ते सावळे रूप मला अत्यंत कोमल आणि विनम्र वाटलं …

साम्यवादी चळवळीत अण्णाभाऊंना विविध शिबिरांतून भाषणांतून आधुनिक जगातील सर्व प्रवाह समजत असत. गिरणी कामगारांचे संघर्षमय जीवन जगणार्‍याने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोषक सत्तेचे स्वरूप ओळखले. ‘सर्व सत्ता लोकांसाठी’ करायची असेल तर पुरोगामी विचार या मातीच्या लोककलेतून मांडायला हवा. अण्णाभाऊ आणि त्यांचे सहकारी इंडियन पीपल्स थिएटर’ (इष्टा) या संस्थेमार्फत लोकजागृतीची विविध माध्यमे वापरत असत. यात स्मृतिशेष बलराज सहानी, नीतिन  सेठी, ए. के. हन्गल, कबीर बेदी – रमेश तलवार, सुलभा आर्य आदि कलावंत सहभागी होत असत.

अण्णाभाऊंचा आधुनिक चित्रपटसृष्टीशी आणि त्यातील कथानक पात्रांशी इंग्रजी चित्रपटाच्या माध्यमातून संपर्क होता. ‘मेट्रो’ ला लागलेले उत्कृष्ट इंग्रजी चित्रपट ते कधी चुकवीत नसत – तेव्हा तत्कालिन प्रसिद्ध चित्रपट BENHUR QUAWADIS THE TEN COMANDMENTS M.G. वेल्सचे THE TIME MACHINE त्याच प्रमाणे चार्ली चॅप्लीनचे प्रख्यात चित्रपट  MODERN TIMES CITY LIGHT हे अत्यंत प्रभावी होते.

अण्णाभाऊंना ‘कथा’ सांगण्याची-लिहिण्याची जबरदस्त ओढ होती ! त्यांनी कादंबरी हा प्रकार अत्यंत परिणामकारक रीतीने हाताळला. मॅक्झिम गॉर्की, पर्ल बक यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद त्यांनी वाचले होते. विशेषत: जागतिक वाङ्मयात रशियन कादंबरी अत्यंत श्रेष्ठ गणली जाते. उदा., ‘क्राईम अँड पनिशमेंट’ सारखी अजरामर कादंबरी. अनेक भाषांत चित्रपटाचे विषय होते. त्या साहित्यकृतीवरील रशियन चित्रपटही अत्यंत भव्य दिव्य होते. अण्णाभाऊंनी याचा जिवंत अनुभव घेतला होता.

चित्रीकरण सुरू

अगदी सकाळीच आम्ही अकोळनेरसाठी रवाना होत असू. मी आणि माझा मित्र लक्ष्मीनारायण रोहीवाल, आम्ही डेव्हीड यांना सोबत देत होतो. सिने अभिनेते डेव्हिड त्यात गोर्‍या इंग्रज अधिकार्‍यांची भूमिका करीत होते.

विष्णुपंत कुलकर्णी, नाना पळशीकर होते. डॉ. श्रीराम रानडे यांची धिप्पाड देहयष्टी असून नाट्याभिनयाची जाण होती. त्यांना फकिराच्या पित्याची भूमिका देण्यात आली. सौ. कमलाबाई रानडे यांनीही सावकार पत्नीची भूमिका केली. आमचे मित्र दूर इंग्रज अधिकार्‍यांचे शिपाई म्हणून उभे राहत असत. व्ही. शांताराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक असलेले कुमार चंद्रशेखर हे दिग्दर्शक होते. चित्रिकरणाचे काम फारच कंटाळवाणे होते. एक एक दृश्य घेण्यासाठी कितीतरी वेळा तालीम करावी लागे. प्रत्येक वेळी तो ‘मूड’ येईलच असे नव्हते. नदीच्या पात्रात दहापंधरा वेळा उतरून तोच तोच ‘सिन’ देताना कमालीचे धैर्य लागते. रूपेरी कागदाचे फळ्यांवरचे पडदे .. पांढर्‍या कपड्यांना निळसर रंग दिलेला. चित्रपट सृष्टीचे लोक म्हणजे आम्हाला देवलोकातील गंधर्वच वाटत हाते. तेथील मातंग वस्तीत मातीचे घर, त्यातील चूल आणि त्याच ठिकाणी तळपणारी ‘फकिरा’ ची तलवार. आमच्या समोर हे विस्मयकारी चित्रीकरण घडत होत होते.

अहमदगनर हे ऐतिहासिक शहर आहे. त्यातील काही वाडे – किल्ला-मशिदी पाहून चित्रपटातील कलावंत मंडळी खूप खुश होत. कुणी काही वस्तू मागायचा अवकाश की आम्ही ती आणून द्यायला तत्पर असू. के. ए. अब्बासना कुणीतरी म्हणालं इथं ‘बर्फी’ फार चांगली मिळते. झालं ! रात्री अकराच्या सुमारास चितळे रोडवरील वखारेच्या हॉटेलात त्यांना बर्फी खाऊ घातली.

डॉ. रानडे यांचा दरबार !

अहमदनगरमधील सारडा गल्लीत आमचे जुने घर आहे. डॉ. श्रीराम रानडे यांच्याकडे सर्व कलावंत येत असत. डॉ. साहेब दिलदार आणि पुरोगामी चळवळीचे समर्थक असल्याने त्यांचा ‘दरबार’ म्हणजेच दिवाणखाना नेहमी कलावंतांनी फुललेला असे. फकिरातील विष्णुपंत कुलकर्णी म्हणजेच ज्येष्ठ नटवर्य नाना पळशीकर गप्पा मारीत. तेही कुठेतरी मुंबईला घाटकोपरच्या डोंगरावर झोपडपट्टीजवळच रहात होते. त्यांना दलित जीवनाची अत्यंत जवळून जाणीव होती.’

‘फकिरा’ चे चित्रीकरण म्हणजे नगरकरांचा चित्रपट उत्सवच होता. चंद्रकांत, सूर्यकांत हे अभिनेते भालजी पेंढारकरांच्या चित्रपटामुळे विशेष प्रसिद्ध होते.

या सगळ्या धामधुमीत मला ताप आला आणि एकदोन दिवस मी तिकडे फिरकलोलो नाही. डॉक्टरसाहेबांना संध्याकाळी मित्रासमवेत अहमदनगर स्टेशनवर  जाऊन तेथील स्पेशल चहा पिण्याची सवय होती. ‘चहा’ तयार होईपर्यंत आम्ही वेटींग रूममध्ये गप्पा मारीत असू. पण दोन दिवस मी नव्हतो. अचानक रात्री नऊच्या सुमारास डॉ. रानडे यांची २४२४ ही गाडी सारडा गल्लीत आली.

‘डॉक्टर आले… डॉक्टर आले …. अशी तमाम गल्लीत द्वाही पसरली. मी तिसर्‍या मजल्यावर होतो. डॉक्टरसाहेब आमचा अत्यंत अवघड फरशीचा जिना चढून वर आले. त्यांचे उंचेपुरे व्यक्तिमत्त्व अशा जिन्यातून सहजतेने चढणे मुश्कील होते. त्यांना आपले ‘डोके’ वाचवून चढावे लागले ! डॉक्टरसाहेब आत येताच मी उठून बसलो. पहातो तर त्यांच्यामागे ‘फकिरा’ ची भूमिका करणारे अभिनेते ‘सूर्यकांत’. विष्णूपंत कुलकर्णी – ऊर्फ नाना पळशीकर होते. आमच्या घरातील दोन लाकडी व एक लोखंडी खुर्ची देण्यात आली. आपल्या घरांत चित्रपटातील मंडळी आली आहेत हे  फक्त माझ्या मोठ्या भावालाच माहीत होते. वडिलांना डॉक्टरसाहेब घरी आले याचेच ‘अप्रूप’ होते…

‘‘काय म्हणतोस रतन ?’’ डॉक्टर म्हणाले.

‘‘काही नाही, जरा ताप होता…..’’ मी म्हणालो.

‘‘कसला ताप – नुसता भटकतोस !‘’ ते म्हणाले. खरे म्हणजे डॉ. रानडे यांच्यासमोर पेशंट त्यांना पाहूनच बरा होत असे.

‘‘उद्या सकाळी येतो.’’ मी म्हणालो.

‘‘डॉक्टरसाहेब, आज आपण आलात आणि विष्णुपंतांना व सूर्यकांतनापण बरोबर आणले.’’

‘‘यांनाही रात्री लवकर कुठली झोप येते ?’’

‘‘सहज आणले….’’

‘‘अरे वा ! हा फोटो कुणाचा ?’’ सूर्यकांतजींनी विचारले. ‘‘मगजींचा… माझ्या आजोबांचा !’’ मी म्हणालो. माझे आजोबा राजपूत योद्ध्यासारखे होते. त्यांच्या पांढर्‍या शुभ्र गलमिशा, डोक्यावर राजस्थानी फेटा, खूपच शोभून दिसत असे.

‘‘डॉक्टरसाहेब, ‘राणोजी’ चा मेकअप असाच हवा नाही ?’’

डॉ. रानडेंना फकिरात  भूमिका देण्यात आली होती. त्यांची धिप्पाड बांधेसूद अंगकाठी ! वेषभूषेनंतर ते खूपच छान दिसायचे !

आमच्या घरातली सगळी मंडळी जिन्यात येऊन हळूच या सिनेअभिनेत्यांना पाहून जात होती. माझ्या वडिलांचा व बंधूंचा मी परिचय करून दिला. आपला रतन वयाने लहान असला तरी किती मोठी मंडळी त्यांच्याकडे येतात असे कौतुकमिश्रित भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मीही मनातल्या मनात भाव खात होतो. ‘फकिरा’ ची क्रांती माझ्या डोक्यात भिनली होती. किती लवकर सगळं बदलून टाकू असं मला झालं होतं. शोषणा मुक्त समाजाचं स्वप्न सतत नजरेसमोर दिसत होता. चहापान करून मंडळी रात्री परत गेली.

मला वाटतं, नदीच्या दोन्ही बाजूला उभे राहून दुसर्‍या दिवशी फकिराचे मस्तक घेण्याचे काम होतं.  फकिराचे अंतिम संस्कार कोण करणार ? इंग्रज सरकारची प्रचंड दहशत होती. या प्रसंगाचे चित्रीकरण होते. कॅमेरा… लाईट … अ‍ॅक्शन … हे शब्द आसमंतात सतत ऐकू येत होते…  फक्त मस्तक ताब्यात घेण्याच्या दृश्याला संपूर्ण दिवसाचे बलिदान करावे लागले.

चित्रपटात भूमिका करणं निर्मिती करणं या गोष्टी सोप्या नाहीत. त्याला अत्यंत कष्ट लागतात. आपल्याला वाटतं, सिनेमात खूप पैसा आहे. पण खरं सांगायचं तर खूप परिश्रम आहेत. अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ त आपले आयुष्य घातले. जगाच्या साहित्यक्षेत्रात एक झुंजार क्रांतिकारक वास्तववादी खर्‍याखुर्‍या पात्राने आपली हजेरी लावली आहे. रिचर्ड अ‍ॅटिन्बरोने ‘गांधी’ निर्माण केला. आता कुणीतरी इंग्रजीत ‘फकिरा’ निर्माण करायला हवा. ‘ज्यूलियस सिझर’, ‘स्पार्टाकस, ‘रॉबिन हूड’, ‘सॅम्सन’ च्या तोडीचा हा ‘नायक’ साकार होईल. ‘फकिरा : द ग्रेट’ ह्या पात्राची मी सिनेमास्कोप पडद्यावर वाट पहात आहे. ‘फकिरा’ माझ्या घरी आला आणि अण्णाभाऊ साठेंच्या झुंजार लेखणीचा अद्भुत चमत्कार मी अनुभवला !

‘अण्णा भाऊ साठे जीवनाच्या मांगल्याचे साहित्यिक’ होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तिसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० डिसेंबरला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; 'आयपी'चे महत्व होणार अधोरेखित  पुणे :...

लोणीकाळभोरमध्ये बनावट RMD-विमल गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त:एक कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील...

इंडिगोची 550 विमानांची उड्डाणे रद्द:एअरलाइनने माफी मागितली, ठीक होण्यासाठी 3 महिने लागतील

एव्हिएशन क्षेत्रातील नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन...

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...