पुणे, ता. 28 जुलै – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना अनेक वर्षांपासून पगार व इतर मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असून, या गंभीर समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आता राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार कायद्याप्रमाणे दिला जात नाही, पेमेंट स्लिप दिली जात नाही, ESIC चे कार्ड मिळत नाही, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे व २ ऑक्टोबर यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सुट्ट्या दिल्या जात नाहीत. कायदेशीर हक्क असलेली पगारी रजा आणि बोनस देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. या सर्व मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली आहेत.
परंतु आजतागायत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मनपा आयुक्तांनी आजपर्यंत कधीच या मुद्द्यांवर बैठक बोलावलेली नाही, हे विशेष.
या सगळ्या परिस्थितीमुळे कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुणे मनपाच्या मुख्य गेटवर जोरदार आंदोलन व मोर्चा धरण्याचा निर्णय राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.
या आंदोलनात मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, कंत्राटी चालक, स्मशानभूमीतील कर्मचारी, NUHM अंतर्गत काम करणारे सिस्टर्स, डॉक्टर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स, सफाई कर्मचारी व झाडू विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली आहे.

