पुणे:- रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमण हटविणे व नव्याने अधिकृत रिक्षा थांबे निर्माण करण्याबाबत आज शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे परिवहन विभाग च्या प्रादेशिक अधिकारी अर्चना गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
पुणे शहर आता पुणे महानगर म्हणून वेगाने विस्तारत आहे. या महानगरात अंदाजे १,३०,००० ऑटो रिक्षा परिवहन विभागाच्या मान्यतेने कार्यरत आहेत. मात्र, या प्रमाणात अधिकृत ऑटो रिक्षा थांबे उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या केवळ सुमारे ६०० अधिकृत रिक्षा थांबे अस्तित्वात आहेत, त्यातही बहुतांश थांब्यांवर खासगी अतिक्रमण, फेरीवाले, वाहनं व अवैध व्यवसायामुळे अडथळा निर्माण झालेला आहे. परिणामी, रिक्षाचालक व प्रवासी यांना असुविधा होत असून वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन होत आहे, त्याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले पुणेकर आधीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहेत, शहरातील मध्यवस्तीत वाहतूक प्रश्न गंभीर बनला आहे त्यांना रिक्षा हा चांगला पर्याय आहे पण थांबे नसल्याने रिक्षा चालक आणि पुणेकर प्रवाश्यांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनाने सदर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
शिवसेना वाहतुक सेनेच्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. सर्व विद्यमान रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे.
२. शहराच्या वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात नवीन रिक्षा थांबे निर्माण करण्यात यावेत.
३. नवीन व जुन्या थांब्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी PMC/PMRDA यांच्यामार्फत अधिसूचना काढण्यात याव्यात.
४. रिक्षाचालक संघटनांशी चर्चा करून स्थानिक गरजा ओळखून योग्य ठिकाणी थांब्यांची योजना करावी.
या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अन्यथा आम्हाला रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांसाठी व पुणेकरांच्या वाहतूक समस्यांसाठी आपल्या कार्यालयाबाहेर शिवसेना पद्धतीने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले .
यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुले, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, सूरज खंडागळे, बाळासाहेब मोडक, जगदीश रेड्डी, योगेश जगदाळे, उपस्थित होते .

