श्री तुळशीबाग गणपतीच्या उत्सव मंडपाचे वासा पूजन संपन्न ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
पुणे : तब्बल १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीला वादनाच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष आणि ढोल ताशांचा निनाद यावेळी तुळशीबागेत घुमला. इतिहासात प्रथमच १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत बाप्पाला वादनातून वंदन केले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन थाटात पार पडले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने आणि पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते. परिसरातील व्यापारी व महिला कार्यकर्त्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मामंडळाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. अरुण बबन भुकन यांच्या सहकुटुंबातर्फे श्रीं चरणी पालखी अर्पण करण्यात आली. ही पालखी ही राजस्थानमध्ये पुखराज मिस्त्री यांनी सागवान लाकडामध्ये घडवलेली आहे
कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे. सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.

