शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क
शनी शिंगणापूर-शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागिल काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.
वास्तविक नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? या बाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, विश्वस्त मंडळाने केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने या अपहाराशी याचा संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते संस्थानमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, अनियमितता समोर आल्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आता शेटे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी देखील यासंदर्भात शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सध्या पोलिसांच्या वतीने शेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून यामध्ये काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चौकशीत काय समोर येणार? हे पहावे लागेल.

