पुणे: पुण्यासह कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.पश्चिम महाराष्ट्रातील चासकमान, वरसगाव, पवना, कासारसाई, मुळशी, राधानगरी, वारणा, दारणा, वालदेवी व वाकी अशा अनेक धरणांतील पाणीपातळीत वाढ होत असून हळूहळू विसर्गामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी-वाऱ्यांसह पाऊस सुरू असून, समुद्राच्या मोठ्या लाटा किनाऱ्यांवर धडकत आहे. हवामान विभागाने ४.८ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना दक्षतेचा इशारा दिला आहे
मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. दारणा धरणातून सर्वाधिक ५,१९८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग ३२२० क्युसेकने वाढवून तो १० हजार २६० क्युसेक इतका केला आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या धरणातच्या पायथा व दरवाज्यातून एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला.

