पुणे : गणेशोत्सवासाठीच्या जाहिरात कमानी उभारण्यासाठी सुरु झालेली घाईगडबडीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या सुमारास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले.सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत येतात. पार्किंग नसलेल्या ठिकाणी, अरुंद व रहदारी असलेल्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग करण्यात आल्याने शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी सुरू झाली होती.
त्यातच गणेशोत्सवातील जाहिरातींच्या कमानी उभारण्यासाठी शनिवारी दुपारपासून बांबू, लोखंडी सापळे भरलेली वाहने मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर उभी राहीली. या वाहनांमधून जाहिरात कमानी उभारण्यासाठी लागणारे बांबू, लोखंडी सापळे उतरविली जाऊ लागल्याने रस्ता आणखीनच अरुंद होऊन वाहतूक कोंडी झाली.
मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासह कुमठेकर, केळकर या रस्त्यांवरही वाहतूक ठप्प झाली होती. मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा परिणाम कर्वे रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्त्यासह अन्य रस्त्यांवरही झाला.
अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक कोंडीमध्ये बराचवेळ गेल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

