पुणे पोलिसांच्या ट्रॅफिक क्रेनच्या हूकने दुचाकी स्वार तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुभम बिरादार असं तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चहोली फाटा, आळंदी-पुणे रोड येथे 25 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. 28 वर्षीय शुभम मगरध्वज बिरादार यांच्या उजव्या डोळ्याला ट्रॅफिक पोलिसांच्या क्रेनच्या हूकमुळे गंभीर दुखापत झाली. शुभम जे पांडवनगर येथे राहतात आणि स्वतःचा ‘शुभम मेडिकल’ नावाचा व्यवसाय चालवतात. यांनी आपली होंडा अॅक्टीवा दुचाकी HDFC बँकेसमोर पार्क केली होती.
बँकेत काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना समजले की, नो-पार्किंग झोनमधील गाड्या उचलण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे क्रेन कार्यरत आहे. शुभम यांनी सांगितले की, त्यांनी आपली दुचाकी उचलली जाऊ नये म्हणून क्रेनजवळ जाऊन हँडल पकडले आणि आपण आल्याचे सांगितले. मात्र, क्रेन चालकाने कोणतीही सूचना न देता हूक हलवला. जो थेट शुभम यांच्या उजव्या डोळ्याला लागला. यामुळे त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले.
तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर दुखापतीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांना मेरीकव्हर हॉस्पिटल, इंद्रायणीनगर येथे दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील रूम क्रमांक 511 मध्ये उपचार सुरू असून त्यांचा MLC क्रमांक 713/2025 आहे. या घटनेने दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शुभम यांनी सांगितले की, क्रेन चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही ओळख किंवा माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलताना योग्य सूचना देणे आणि क्रेन चालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी दिघी-आळंदी वाहतूक विभागाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिकांनी मागणी केली आहे की, वाहतूक पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करावे आणि अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू करावी. तसेच क्रेन चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. शुभम यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार सुरू केला आहे.
पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्याची अंमलबजावणी यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलण्यापूर्वी स्पष्ट सूचना देणे आणि नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे अशा अपघातांना आळा बसू शकतो. ही घटना पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी दर्शवते. शुभम बिरादार यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

