पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने थेट सरकारी नोकरीची मागणी केल्याने अजित पवार त्या व्यक्तीवर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले असून, नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असे आश्वासनही दिले आहे.हा संपूर्ण प्रकार पुण्यातील एका पत्रकार परिषदेदरम्यान घडला. अजित पवार माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देत असताना, अचानक एका तरुणाने थेट त्यांच्या पुढे येऊन “दादा, मला सरकारी नोकरी द्या” अशी मागणी केली. सुरुवातीला पवारांनी संयम राखत, हा मुद्दा क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने त्या व्यक्तीने राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांची भेट घ्यावी, असा सल्ला तरुणाला दिला.
अजित पवारांनी सल्ला दिल्यानंतरही तो युवक बोलतच राहिला. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत “तुला हीच जागा आठवली का हे बोलण्यासाठी?” असा सवाल संबंधित तरुणाला केला. त्यानंतरही त्या व्यक्तीने थांबण्याचे नाव न घेतल्याने “ए, बोलायची ही पद्धत नाही!” असे म्हणत अजित पवारांनी थांबवले. तसेच ”मी माहिती घेईल. मी कागद घेईन. तो व्यवस्थित पाहीन. तू बोलतोय त्यात तथ्य आहे का? हे बघेन. राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण असेल त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसे कळवण्यात येईल,’ असे थेट अजित पवार यांनी त्या व्यक्तीला समजावले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्या पुरुषांनी या योजनेचा गैरवापर करून लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, या योजनेत पुरुष लोकांची नावे येण्याचे काहीच कारण नाही. जर या योजनेत पुरुषांची नावे आलेली असतील, तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू. त्यांनी जर सहकार्य केले नाही तर, ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला.

