जळगाव- एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तीन चॅलेंज स्वीकारण्याचे आव्हान दिले आहे. स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा, माझ्या मुलाची मृत्यूची सीआयडी चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी महाजन यांना दिले आहे.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पलटवार करत एकनाथ खडसे म्हणाले की, ‘त्यांनी माझे चॅनेल स्विकारावे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी, माझ्या मुलाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी आणि प्रफुल्ल लोढा याने महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्याची नार्को टेस्ट करावी. हे माझे महाजन यांना आव्हान असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी विकासाच्या मुद्यावरून देखील गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. महाजन यांनी जिल्ह्यात कोणते मोठे विकासाचे काम केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर आपल्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पाढा देखील त्यांनी वाचला. महाजन हे केवळ अर्ध्या खात्याचे मंत्री असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. महाजन यांच्या हिंमत असेल तर त्यांनी केलेल्या मोठ्या विकास कामाचे एकतरी उदाहरण दाखवावे? असेही आव्हान खडसे यांनी दिले आहे. जिल्ह्यात झालेली सर्व धरणे ही माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात मंगेश चव्हाण यांनी देखील उडी घेतली होती. एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यावर देखील खडसे यांनी पलटवार केला आहे. मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी पुरावा दाखवावा. त्यांनी एक जरी पुरावा दाखवला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल, असे थेट आव्हान देखील एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

