पुणे : एफसी रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण वाढल्याने पदपथ पादचाऱ्यांसाठी कि विक्रेत्यांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सातत्याने कारवाई करुन देखील अतिक्रमण होत असल्याने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आवाज उठविल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत अतिक्रमणे काढून टाकली.मात्र एकीकडे रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे काढत असताना दुसरीकडे मोठ मोठ्या इमारतीमधील अनधिकृत बांधकामांकडे तसेच साईड मार्जिन मध्ये अतिक्रमणे करून याच परिसरात असलेल्या बड्या व्यवसायिकांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने सामन्य लोकांवर कारवाई आणि बड्यांना अभय असे चित्र येथे निर्माण झालेले दिसते आहे. बड्या इमारती मधील अनधिकृत बांधकामे आणि साईड मर्जीन मधील बांधकामे किंवा अतिक्रमणे यामुळे तिथे होऊ शकणारे पार्किंग रस्त्यावरील पार्किंगची जागा बळकावत असल्याने हि वाहतुकीची आणि पार्किंग ची समस्या निर्माण होत असल्याचे कारण दिले जाते आहे. ज्याकडे महापालिका वारंवार नव्हे तर वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत आली आहे. येथील प्रख्यात हॉटेल्स देखील अशाच अनधिकृत छत्राखाली चालत असल्याचे स्पष्ट आहे .पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही अशी स्थिती आहे.
एफसी रस्त्याला अतिक्रमणाचा वेढा पडलेला आहे. या रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी असते. तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची रहदारी लक्षणीय आहे. याचाच फायदा घेत एफसी रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण करत ठाण मांडले आहे. हा भाग शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येतो. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात पदपथांवर केल्या जाणाऱ्या अतिक्रमणांवर चर्चा झाली होती. दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्येही या दोन्ही रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणांबाबत शिरोळे यांनी नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कारभारावर शंका घेतली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पावले उचलत कारवाई केली आहे.
एफसी रस्त्यावरील आर्यभूषण पंपिंग स्टेशन, खंडोजी बाबा चौक, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण करुन बेकायदा पद्धतीने गॅस सिलिंडरचा वापर करणारे खाद्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक तसेच खेळणी, कटलरी, होजिअरी व्यावसायिकांच्या बाबत महापालिकेला तक्रारी मिळाल्या होत्या. महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आनियेथे अनधिकृतपणे व्यवसाय करणारांवर कारवाई केली .
एफसी रस्त्यासह जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करवा लागत होता. त्यामुळे महापालिकेच्या अतिकमण विभागाच्या पथकाने या दोन्ही रस्त्यावरील बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्या वस्तू जप्त केल्या. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डेक्कन पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
सहाय्यक महापालिका आयुक्त तिम्मया जंगले, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय कुंभार, सहायक अतिक्रमण निरीक्षक रवी जाधव, शरद पवार, भरत बिरादार यांचे पथकाने FC रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये २२ कपडे पथारी व्यावसायिक, २१ गँस सिलिंडर, ९ शेड यांच्यावर कारवाई करुन ते काढून टाकण्यात आले. कारवाई पथकामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे (एमएसएफ) सहा जवान, १० बिगारी सेवक, एक ट्रक, एक पिंजरा यांचा समावेश होता. या दोन्ही रस्त्यांसह शहरातील इतर भागातही अशी कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत गजानन महाराज पथ येथे अनधिकृत गणेश मुर्ती विक्री मांडवांवर Ward officer, अतिक्रमण निर्मूलन स्टाफ आणि स्थानिक बंदोबस्त यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
विक्री व्यवसायिकांना रीतसर वाहतूक NOC नंतर अधिकृत पणे परवानगी देण्यात येईल असे महापालिकेने सांगितले आहे.
स्थानिक कार्यकर्ते यांनी यावेळी मोठा विरोध कार्यवाहीच्या सुरुवातीस केला, परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यवाही झाली…तसेच सदर कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व स्थानिक पोलीसांनी बंदोबस्त दिला

