- छत्रपती शिवाजीनगरमध्ये खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा
पुणे – नागरिकांचे प्रश्न थेट समजून घेता यावेत आणि ते सोडविले जावेत, या उद्देशाने केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरु केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु असून रविवारी हे अभियान छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता, औंध येथील इंदिरा गांधी शाळा येथे हा उपक्रम होणार आहे. या अभियानात नागरिकांनी आपले प्रश्न, समस्या आणि नवकल्पना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी विधानसभानिहाय “जनता दरबार” या स्वरूपात हा उपक्रम सुरू केला. या संवादातून नागरिकांच्या नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि नव्या कल्पनांचा विचार करून त्यावर कार्यवाही करण्यात येते. सध्या सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असून यात कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आता छत्रपती शिवाजीनगरमध्ये दुसऱ्यांदा हे अभियान होत आहे.या उपक्रमात महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत, जेथे नागरिकांना थेट माहिती मिळते आणि समस्यांचे निराकरणही करता येते. तसेच केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देखील उपलब्ध करून दिली जाते आणि पात्र लाभार्थ्यांना लाभही घेता येईल.या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले,“माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी पुणेकरांचा खासदार म्हणून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. आतापर्यंत झालेल्या अभियानांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. छत्रपती शिवाजीनगरकरांनी पुन्हा एकदा आपल्या भागातील मुद्दे, अडचणी आणि सूचना घेऊन या अभियानात भाग घ्यावा, ही विनंती आहे. या उपक्रमातून अनेक प्रश्न मार्गी लागले असून नागरिकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देत आहेत.”या अभियानामुळे सशक्त लोकप्रतिनिधित्व, प्रभावी संवाद आणि गतिमान कामकाज याला चालना मिळत असून जनतेचा सरकारशी थेट संपर्क घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे.

