संपूर्ण देशभर ग्राहक सेवा बळकट करण्याचे उद्दिष्ट्य
मुंबई, 25 जुलै 2025: देशाची सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया देशभरातील आपल्या विस्तृत शाखा नेटवर्कमध्ये नव्याने भरती करण्यात आलेल्या 13,455 ज्युनिअर असोसिएट्स (कनिष्ठ सहायक) च्या नेमणुकीला सुरुवात करत आहे.
हे नवे असोसिएट्स बँकेच्या अग्रणी, आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीत एक मोलाची भर घालत आहेत. त्यायोगे एसबीआयच्या सेवाभावाला अनुसरून नवचैतन्य, बांधिलकी आणि ग्राहक प्रथम हा दृष्टिकोन जोमाने पुढे येत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा अनुभव उंचावण्यासाठी आणि प्रत्येक पातळीवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे.
एसबीआयने 11 जून रोजी ज्युनिअर असोसिएट्सच्या भरतीची घोषणा केली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. सी. एस. सेठी यांनी बदलत्या कार्यात्मक व तांत्रिक गरजांशी सुसंगत अशा सुव्यवस्थित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे मनुष्यबळ विकास क्षमतेच्या बळकटीकरणावर भर दिला होता.
एसबीआयचे 2,36,000 हून अधिक कर्मचारी असून बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पुढील पिढीला घडवण्याचा त्यांना अभिमान आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक भविष्याच्या उभारणीसाठी एसबीआय कटिबद्ध आहे.

