नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व चर्चांदरम्यान, भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाजूला करत त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील फेरबदलाबद्दल कोणतीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर होत असतो. अशा प्रकारचा काही बदल होणार असेल, तर तो योग्य वेळी कळतो, पण सध्या असा काही बदल होईल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षपदाबद्दलही आपल्याला सध्या काही माहिती नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढील काळात नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचे काम होणार नाही.

