पुणेःनऱ्हे येथील किशोरी प्रांगण गृहप्रकल्पात १५० ग्राहकांनी वीस टक्के बुकिंग रक्कम भरून देखील प्रकल्पाचे चार वर्ष बांधकाम सुरु न केल्याने १८ कोटीची फसवणूक झाली असून हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या ग्राहकांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर विषप्राशन आंदोलनाचा इशारा दिला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता ही पत्रकार परिषद झाली.या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे ,ग्राहकांच्या कायदेशीर सल्लागार एड.नीता जोशी, ग्राहकांचे प्रतिनिधी गिरीश चौधरी, प्रशांत कोल्हे,सूर्यकांत कुंभार उपस्थित होते.
कसबा पेठेतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेटे,तसेच विजय रायकर हे किशोरी प्रांगण एल एल पी या भागीदारी संस्थेत भागीदार आहेत.जागामालक निलेश दांगट,शाम दांगट यांनी या जागेचा विकसन करारनामा ( DAPA Agreement) हे दिनांक ०३/११/२०२१ रोजी केले आहे.कोणतातरी राजकीय दबाव पोलीस यंत्रणेवर आहे,असा आरोप या ग्राहकांनी पत्रकार परिषदेत केला.तसेच पोलिसांच्या वर्तणूक बाबत शंका सुद्धा व्यक्त केली.
२०२१ साली १५० ग्राहकांनी नऱ्हे येथील किशोरी प्रांगण या गृहप्रकल्पात २० टक्के रक्कम भरून १५० ग्राहकांनी बुकींग केले. रेरा रजिस्ट्रेशन असतानाही हे पैसे बिल्डरने रेरा अकाऊंटला न घेता वैयक्तिक खात्यात घेतले. बुकींगचे निबंधक कार्यालयात नोंदणी रजिस्ट्रेशन केले नाही. बांधकामही सुरु केले नाही.आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी २०२४ मध्ये सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात तक्रार केली.३० ग्राहकांनी एकत्र येऊन सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार नंतर पोलिस कमिशनर ऑफिसला वर्ग करण्यात आली आहे व त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कैलास करे हे करत आहेत. सर्व सभासदांची स्टेटमेंट नोंद करूनही साधारण २ महिने झाले तरीही पोलिस बिल्डर्स च्या विरोधात व जागा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीत.या ग्राहकांचे कर्ज आणि हप्ते सुरु झाले आहेत,सध्या जिथे राहतात त्या जागेचे घरभाडे सुरु आहे.सिबिल खराब होऊ नये म्हणून हप्ते थकवता येत नाहीत आणि पोलीस दाद देत नाहीत,अशी बिकट अवस्था या दीडशे ग्राहकांची झाली आहे.आत्तापर्यंत यातील दोघांनी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे, पोलिसांना हे सांगून सुद्धा त्यात काही प्रगती होत नाही .
‘आम्ही पोलिसांना पैसे दिले आहेत.आमचे काही वाकडे होणार नाही’ असे हे बिल्डर ग्राहकांना तोंडावर सांगत असतात.२०% रक्कम गुंतविल्यास सदनिकेचा करारनामा करून देणार हे आश्वासन बिल्डर व जागा मालक अशा तिघांनी केल्याप्रमाणे साधारण १५० जणांनी फ्लॅट बुकींग केले .बिल्डरकडे ती रक्कम साधारण १८ कोटी पेक्षा जास्त जमा झाली आहे.ही रक्कम जमा करूनही अनेक सभासदांचे फ्लाटचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. दर वेळी प्रकल्प उशीरा सुरू होणार आहे याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. सदर प्रकल्प हा रेरा रजिस्ट्रेशन झाला आहे. रेरा सर्टिफिकेट प्रमाणे सदर प्रकल्प हा डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला पाहीजे. पण आजतागायत त्या जागेवर खड्डाही मारलेला नाही.
पोलिसांनी,आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई न केल्यास पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर विष प्राशन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

