दिल्ली : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दिल्लीमध्ये आवाज बुलंद करणार्या चिंतामणराव देशमुख (सी. डी. देशमुख) यांची कारकीर्द मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी आहे. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, भारताचे माजी अर्थमंत्री, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांना विरोध म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख (चिंतामणराव देशमुख) यांना यथोचित आदरांजली देण्यासाठी दिल्लीत होणार्या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सी. डी. देशमुख यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला. यावर्षीचा हा दुसरा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राचा गौरव दिल्लीत वाढविणार्या आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक ऐक्याचा सातत्याने ठामपणे पुरस्कार करणार्या केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री मा. नितीन गडकरी यांना मंगळवार दि. २९ जुलै २०२५ रोजी मा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र १ लक्ष १ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याच कार्यक्रमात दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून आपली छाप उमटविणार्या मराठी नेत्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित धनंजय बिजले यांनी लिहिलेल्या ‘महामुद्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी तसेच शरद पवार यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उदयोग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ. गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत बँक्वेट हॉल, नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार व लेशपाल जवळगे यांनी आज दिल्ली येथे एका पत्रकाद्वारे दिली.
नितीन गडकरी यांना दुसरा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते २९ जुलै रोजी दिल्लीत प्रदान करणार
Date:

