पुणे: लोहगाव येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येत्या ऑक्टोबर अखेरीस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली आहे.
सोबतच, आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता २०० खाटांपर्यंत करा, अशीही निविदनाद्वारे मागणी केली आहे.
लोहगाव उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यासाठी बापूसाहेब पठारे अनेक वर्षांपासून सातत्याने विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत. सन २०१३ मध्ये या रुग्णालयासाठीची मंजुरी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. पुणे शहरातील ससून रुग्णालयावरील ताण कमी करणे, तसेच परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, या हेतूने हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ते सुरू करण्याचा मनोदय बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला आहे. पठारे सातत्याने या रुग्णालयाच्या कामाची पाहणी व पाठपुरावा करत आले आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबत आरोग्यमंत्र्यांना विचारणा केली होती. यावर आरोग्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असल्याची माहिती दिली होती.
लोहगाव परिसरात नागरिकरण वेगाने वाढत असून पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर जिल्ह्यांतील तसेच परराज्यातून आलेले अनेक नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. यामुळे लोहगावमधील हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या या परिसरात अंतर्गत व बाह्य रिंगरोडची कामे सुरू असल्याने भविष्यात लोहगावचा विकास वेगाने होईल, हे लक्षात घेता या रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता अपुरी पडणार आहे. भविष्यात शहरात नवीन रुग्णालयासाठी जागा मिळणे अवघड असेल, म्हणून सद्यःस्थितीतच रुग्णालयाची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ते सातत्याने पाहणी व पाठपुरावा करत असून संबंधित प्रशासनाकडेही विनंती केली आहे.

