पुणे: येथील पुणे विद्यार्थी गृहाचे (पीव्हीजी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय व प्रोग्रेशन स्कुल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत महाविद्यालयात ‘अजेंटिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणार आहे. या केंद्रामुळे एआय क्षेत्रातील संशोधन व विकास वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमतेचा झपाट्याने वाढणारा वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे.
जागतिक एआय दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने ‘भविष्यातील एआयचा वापर’ यावर चार दिवसीय अजेंटिक एआय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण घेता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’च्या वतीने अत्याधुनिक ५०० आसनक्षमतेचे, पूर्णपणे वायफाय सक्षम सभागृह डायनॅमिक लर्निंग हबमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे ३०० ते ४०० सहभागींसाठी एकाच वेळी थेट कोडिंग सत्रे आयोजित केली गेली. या मोठ्या प्रमाणावरील हॅण्ड्स ऑन सहभागामुळे चार दिवसांत जवळपास १००० हून अधिक सहभागींना अजेंटिक एआयचे बारकावे सखोल आणि विस्तृत पद्धतीने शिकण्याची संधी मिळाली.
एक्सेलरंट टेक्नॉलॉजीजचे (लर्निंग अँड डेव्हलपमेंट) व प्रोग्रेशन स्कूलचे संचालक विवेक अग्रवाल यांनी कार्यशाळेचे नेतृत्व केले. उद्योजक रोहित घोष यांनी महत्त्वाचे व्यावसायिक दृष्टिकोन सांगितले. प्रोग्रेशन स्कूलच्या माईंड कोच श्रीमती मृदुला उज्वल यांनी ताण व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने भागीदार कंपन्यांबरोबर धोरणात्मक बाबींच्या पूर्ततेसंदर्भात चर्चा केली. महाविद्यालयाचे संचालक सुनिल रेडेकर, प्रा. राजेंद्र कडुसकर, प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आणि डॉ. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
सुनील रेडेकर म्हणाले, “प्रगत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानातील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व सर्वांगिण प्रगतीसाठी आयोजित करण्यात येतील. तंत्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकास आणि महत्त्वपूर्ण औद्योगिक शैक्षणिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यास महाविद्यालय आधिकाधिक उपक्रम राबवेल.”

