मुंबई-कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण दिले आहे . ते म्हणाले, आम्ही हर्षल पाटीलला काम दिले नव्हते, आम्ही संबंधित कंत्राट एका कंत्राटदाराला दिलेले आहे. त्या कंत्राटदाराने हर्षल पाटील यांना सबकंत्राटदार म्हणून नेमले आहे. आमचा संबंध हा कंत्राटदाराशी येतो. सबकंत्राटदाराशी नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याने आता तेही या प्रकरनी टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे. बिले मिळत नाहीत, असे बोलणे खूप सोपे असते. बिले देण्यासाठी काही नियम असतात. काम झालंय का? दर्जाचे झालंय का? त्यामध्ये कुठली अडचण नाही ना? या सगळ्या गोष्टी तपासून बिले दिली जातात. आम्ही बिले थकवू देणार नाही. कोणत्या कंत्राटदारांची बिले बाकी आहेत, त्यांच्या नावांची यादी मला द्या, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे. .
जल जीवन मिशन अंतर्गत काम केलेल्या तरुण कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय हर्षल पाटील असे या कंत्राटदाराचे नाव असून, सरकारच्या विविध विभागाकडून सुमारे दिड कोटी रुपयांची बिले थकल्याने आपल्या शेतात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुनच बोलताना अजित पवार यांनी सरकारने हर्षल पाटीलला कंत्राट दिले नव्हते असे म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले कि,’आज सकाळी १० वाजता एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये राज्याचे मुख्य सचिव आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. या मीटिंगमध्ये ही या प्रकरणाची माहिती घेतली. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राट एका कंत्राटदाराला दिलेले आहे. त्या कंत्राटदाराने हर्षल पाटील यांना सबकंत्राटदार म्हणून नेमले आहे. आमचा संबंध हा कंत्राटदाराशी येतो. कंत्राटदाराचे जशी बिले येतील, तसे आम्ही पैसे देणार. पण सबकंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही. तो कंत्राटदारांचा अधिकार आहे. आता कंत्राटदार आणि सबकंत्राटदार यांच्यात काय झाले? याची आम्हाला माहिती नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
जलजीवन ही केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये ५० टक्के केंद्राचा तर ५० राज्याचा निधी असतो. आम्ही हर्षल पाटील यांना कंत्राट दिले नव्हते. पण एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्यामागणी नक्की काय कारणे आहेत, याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. या तपासादरम्यान, काही मोबाईल तपासले जात आहेत. आत्महत्या करण्याआधी त्यांनी कुणाकुणाला फोन केले. अशा प्रकारची सर्व माहिती पोलिस यंत्रणा मिळवत आहे. मी राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण त्याला आम्ही काम दिलेले नव्हते. संबंधित काम दुसरा कंत्राटदार करत होता. त्याच्या हाताखाली हर्षल पाटील काम करत होता, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

