पुणे: लोहगाव मधील हरणतळे, पवार वस्ती, खांदवेनगर येथे नवीन मतदान केंद्रे स्थापन झाली पाहिजेत, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी येरवडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार आज संबंधित अधिकाऱ्यांकडून संबंधित स्थळांची पाहणी देखील केली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये लोहगाव परिसर झपाट्याने वाढला आहे. मतदार संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळते आहे. परिणामी, सध्याच्या मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून काही खांदवेनगर भागांतील मतदारांना ८ ते १० किमी अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे.
मतदारांना ही ये-जा असुविधाजनक व त्रासदायक ठरत असल्याने नव्या मतदान केंद्र सुरु होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
हरणतळे, लेक व्ह्यू सिटी, जनार्दन नगर व आजूबाजूच्या परिसरात दाट वस्ती झाली आहे. या भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून ते सध्या लांबच्या मतदान केंद्रांवर जात आहेत. त्यामुळे हरणतळे येथील मनपा शाळेत नवीन मतदान केंद्र स्थापन केल्यास स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.
पवारवस्ती, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती, काळभोर पार्क, माळवाडी, वॉटर पार्क रोड आणि कर्मभूमी या भागांत नव्या गृहप्रकल्पांमुळे झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. पवारवस्ती येथील मनपा शाळा हा नव्या केंद्रासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.
खांदवेनगर, नगर रस्ता, रामचंद्र काळे नगर, संताजी नगर, गोठण ओढा, फॉर्च्यून सिटी, गोकुळ पार्क व गणेश पार्क हे परिसर सध्या प्रचंड वेगाने विकसित होत आहेत. या भागातील मतदारांना आजही लांब अंतरावरील मतदान केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खांदवे नगर येथील मनपा शाळेत नवीन मतदान केंद्र उपयुक्त ठरेल.
निवडणूक विभागाने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केली. सोबतच, मतदार यादीतील खांदवे नगर झोपडपट्टी असा चुकीचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी याभागाचा शोध घेऊन ही सापडत नाही. पर्यायाने अचूक काम होत नाही त्यामुळे मतदार यादीवर खांदवे नगर असाच योग्य उल्लेख यावा. यातून झोपडपट्टी शब्द वगळावा अशीही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

