पुणे : किशोर कुमार, महंमद रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंतकुमार, गीता दत्त, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमुद या प्रसिद्ध गायकांनी लोकप्रिय केलेल्या अजरामर गीतांचा नजराणा हिंमत कुमार पंड्या, गितांजली जेधे या कलाकारांनी पुणेकर रसिकांसमोर पेश केला. तरुणांसह ज्येष्ठांनी जुन्या सदाबहार हिंदी गीतांचा आनंद घेत फर्माईशीतून खुलत गेलेल्या गाण्यांना टाळ्या-शिट्ट्यांनी मनमुराद दाद दिली. तर अनेक गाण्यांवर जेष्ठांनी गायकांच्या सुरात सुर मिसळत गायनाचा आनंद लुटला.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे ‘छायागीत’ या जुन्या हिंदी अवीट गोडीच्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफलीत कलाकारांनी ४० पेक्षा जास्त गीते ऐकविली. कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने करण्यात आली.
‘जीवनसे भरी तेरी आँखे’, ‘लुटे कोई मन का नगर’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘कोरा कागज था’, ‘वो शाम कुछ अजिब थी’, ‘मै हु झुम झुम झुम झुमरू’, ‘मेरे मेहबुब ना जा’, ‘नखरेवाली’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ओ मेरी जोहरा जबी’, ‘लग जा गले’, ‘जय जय शिवशंकर’, ‘याद किया दिल ने’, ‘बदन पे सितारे लपेटे हुऐ’, ‘शाम ए गम की कसम’, ‘तेरी आखों के सिवा’ अशी एकाहून एक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. ‘लागा चुनरिमे दाग’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे गीत कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरले. आपल्या समर्पक निवेदनाने अनुराधा भारती यांनी कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमाचे संयोजन किशोर सरपोतदार यांनी केले. सुरुवातीस अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. तर प्रास्ताविक प्रांजली गांधी यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोककुमार सराफ, निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांनी केला. सतिश देव, डॉ. रोहिणी काळे, डॉ. प्रसाद पिंपळखरे, आनंद सराफ, ॲड. मोहन शेटे, संत साहित्याचे अभ्यासक श्रीयुत तापकीर, डी. के. अभ्यंकर, समिर धर्माधिकारी, जमिर दरबार, श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या सान्निध्यात एक उनाड सायंकाळ..!पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘छायागीत’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद
Date:

