पंढरपूर -महाराष्ट्रामध्ये सर्व नेते वैचारिक विरोधक असतील मात्र, ते शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या दिवशी, एखाद्याच्या अभीष्टचिंतन प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे, याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांनी याचा चूकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन केले आहे. या विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, याचा चूकीचा अर्थ काढून महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का? असा याचा अन्यथा अर्थ निघेल त्यामुळेच याला याच परिक्षेपात पाहायला हवे. जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केले, त्यांनी ज्या महाराष्ट्रातील प्रमुख दोनही नेत्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित ठरेल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

