पुणे: दक्षिण कोरियात नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चरल एक्स्पो २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या आठ खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ४ सुवर्ण, १० रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. हे खेळाडू आर. बी. होरांगी तायक्वांदो अकादमी आणि सेंट फेलिक्स हायस्कूलचे विद्यार्थी असून त्यांना प्रशिक्षक मास्तर रवींद्र भांडारी यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत पुमसे आणि क्युरोगी प्रकारांत आयुषी भांडारी, झोया खान, हर्ष निकम आणि वाल्मीकी चौरसिया यांनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. समीक्षा साबळे आणि पवन ननावरे यांनी प्रत्येकी दोन रौप्य पदके पटकावली. स्वलिहा खान आणि अनुष्का चिनाय्या यांनी प्रत्येकी एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले.
दक्षिण कोरियातील कुकिवॉन – वर्ल्ड तायक्वांदो मुख्यालय येथे खेळाडूंना अधिकृत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर खेळाडूंनी वर्ल्ड हपकीदो आणि कुमदो मार्शल आर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष ग्रँडमास्टर डॉन ओ चोई यांच्या डोजांगमध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्याकडून ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रे व सुवर्ण पदके मिळवली.
तसेच खेळाडूंनी कोरिया शिन (९ वा डॅन, चंग-डो क्वान), ग्रँडमास्टर ह्युंगनाम क्वोन (९ वा डॅन, पूमसे प्रशिक्षक) आणि ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते ग्रँडमास्टर मून डे-सुंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि वैयक्तिक सन्मान व प्रमाणपत्रे प्राप्त केली. या दौऱ्यादरम्यान अर्चना चिनाय्या यांनी पालक म्हणून संघास साथ दिली.
पुण्यात परतल्यानंतर सेंट फेलिक्स शाळेच्या वतीने प्रांतीय प्रमुख सिस्टर उर्सुला पिंटो, सिस्टर जेनिफर परेरा, शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर रोझमेरी आल्मेडा, प्राचार्या लीना पॉल, सिस्टर एल्सा व श्रीमती बेला डिसिल्वा यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.
ही कामगिरी केवळ पदकांची कमाई नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याच्या युवा खेळाडूंनी मिळवलेले मानांकन आणि तायक्वांदो क्षेत्रातील पुण्याचे उंचावलेले स्थान दर्शवणारी ठरली. या यशामागे मास्टर रवींद्र भांडारी यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

