पुणे -शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रति इतके निष्काळजी असलेले कृषिमंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच… माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत “ओसाड गावची पाटीलकी” सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत, मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळीजगन्नाथ शेवाळे, शेखर धावडे, फहीम शेख, रोहन पायगुडे, असिफ शेख, दीपक कामठे, रानु साने, योगेश पवार, पूजा काटकर, गौरव जाधव, फिरोज तांबोळी, प्राजक्ता जाधव, विमल झुंबरे, रुपाली शेलार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रशांत जगताप यांनी तीव्र शब्दांत माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी जगताप म्हणाले,’ स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी माणिकराव कोकाटे महाराष्ट्राला भिकारी म्हणत आहेत. अशा व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राहण्याचा काहीही अधिकार नाही. एकतर माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढून टाका, किंवा महाराष्ट्राला जुगारी राज्य बनवण्यासाठी त्यांना थेट मुख्यमंत्री करा अशी खोचक मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे.महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार स्पष्टपणे नकार देत आहे. या असंवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे लोकशाहीच्या पवित्र सभागृहात, म्हणजेच विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळताना चे चित्र सबंध महाराष्ट्राने बघितले आहे.

