पुणे-पुणे शहरातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ दरम्यान तीन अज्ञात व्यक्तीने तुफान राडा घालत गोंधळ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर या भागात त्यांनी तब्बल वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामध्ये १५ रिक्षा, दोन कार आणि एक स्कूल व्हॅन टेम्पोचे नुकसान झाले. सीसीटीव्हीमध्ये तोडफोड करणारे तीघे एका दुचाकीवरुन आलेले दिसत आहेत.याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येत हॉकीस्टीक आणि दगडाच्या सहाय्याने एकूण १५ ऑटो रिक्षा, २ कार, १ स्कूल व्हॅन यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हे हल्लेखोर रस्त्यावर पार्किं केलेल्या वाहनांवर तोडफोड करत असताना त्यांना दोन नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांना हल्लेखोरांनी मारहाण केली. यातील एका रहिवाशाचीदुचाकीही फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
रात्र गस्तीवरील पोलिसांचे पथक आणि सहायक पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र रात्रभर शोधाशोध करुनही हल्लेखोर हाती लागले नाहीत. दरम्यान पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते हे सहकारनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

