पुणे: पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी पुणे-शिरूर मार्गावरील उन्नत पुलाच्या कामास नुकतीच मान्यता मिळाली आहे. सोबतच, रामवाडी ते वाघोली (कटकेवाडी) दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेलाही केंद्र सरकारने मान्यता दिली असून लवकरच दोन्ही कामे सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब तुकाराम पठारे यांनी भविष्यातील दृष्टीकोन समोर ठेवत “पुणे-शिरूर उन्नत पुलाच्या कामात वाघोली (कटकेवाडी) ते रांजणगाव दरम्यान मेट्रोच्या संभाव्य विस्ताराचा विचार करून आवश्यक जागेची व आर्थिक तरतूद करण्यात यावी”, अशी मागणी महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या रामवाडी ते वाघोली (कटकेवाडी) दरम्यान मेट्रो मार्गिकेस मान्यता मिळालेली आहे. मात्र, या मार्गाचा पुढील टप्पा म्हणजे रांजणगावकडे होणारा संभाव्य विस्तार, या उन्नत पुलाच्या रचनेत समाविष्ट केला नाही. तर, भविष्यात जागेअभावी मेट्रोसाठी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले.
राज्य पातळीवर अशा महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची रचना करताना दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो, हे त्यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले आहे.
महा मेट्रोने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळासोबत समन्वय साधून याबाबतची तरतूद करावी, अशी त्यांची विनंती आहे.

