पुणे दि. 22 :- भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर 7 दिवसांच्या आत ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी / कंट्रोलरची तपासणी व पडताळणी करीता उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे. पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघांपैकी 11 विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित 6 उमेदवारांपैकी 4 मतदार संघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे. उर्वरित 2 उमेदवारांच्या अर्जानुसार 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सदर ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
21 जुलै 2025 रोजी 213 – हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमाद्वारे हडपसर विधानसभा मतदार संघातील 27 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रामधील नोंदवलेल्या मतांची मतमोजणी होणार असल्याचा तसेच त्याच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठयांची पुनश्च: मोजणी 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात येणार असल्याचा व्हिडीओ प्रसिध्द केला होता.
त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, तपासणीवेळी भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार संबंधित उमेदवारांनी या कार्यालयास कोणत्या ईव्हीएम मशीन्स तपासावयाच्या आहेत याची यादी दिलेली आहे, त्यानुसार त्या क्रमांकाच्या ईव्हीएम मशीन्स सुरक्षा कक्षातून काढून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर कंट्रोल युनिट मधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत ते दाखवले जाणार आहे. यावेळी विधानसभा निवडणूकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या व्हीव्हीपॅट स्लीपस ची मोजणी होणार नाही. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या व्हिडीओतील निवेदन हे मा. भारत निवडणूक आयोग यांच्या मतदान यंत्रांच्या तपासणी व पडताळणी संदर्भातील मानक प्रणालीनुसार नाही असे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे मिनल कळसकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी,कंट्रोलरची तपासणी व पडताळणी
Date:

