पुणे, दि. २२: बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण असून रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केली
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रमाई आवास घरकुल निर्माण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती, तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय तसेच अनुदानित वसतिगृह निरीक्षण समिती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची आढावा बैठकीत ते बोलत होते.
श्री. लोंढे म्हणाले, समाज कल्याण विभागाच्यावतीने ९७३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र, ८०५ मतदान कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून याबाबत पुणे जिल्हा देशात क्रमांक एकवर आहे. शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष शिबीर आयोजित करावे. याकरिता सामाजिक संस्थेची मदत घ्यावी.
रमाई आवास घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता विशेष मोहीम राबवावी. लाभार्थ्यांचे घरकुलाबाबत एका महिन्यात प्रस्ताव सादर करावे. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक करिता विरंगुळा केंद्राची स्थापना करावी. केंद्राकरिता जागा उपलब्धतेकरिता प्रशासनाने स्थानिक लोकोप्रतिनिधीशी समनव्य साधावा. ज्येष्ठ नागरिकांच्या पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त तक्रारीचे पोलीसाने प्राधान्याने निराकरण करावे. आरोग्य विभागाने त्यांना उपचार वेळेत मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ रोजीच्या धोरणाची अंमलबजावणी करुन ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्याची कार्यवाही करावी.
शासकीय आणि अनुदानित वसतिगृहामधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा करुन अडीअडचणीचे निराकरण करावे. भाड्याच्या जागेवर असलेल्या इमारती शासकीय जागेवर बांधण्याचे नियोजन असून जागांबाबत संबंधित विभागाने पाठपुरावा करावा.
जिल्ह्यातील साखर कारखान्याने संबंधित ग्रामसेवकाशी समन्वय साधून ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात यावे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच कामगारांना नियमितपणे अन्नधान्य मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री. लोंढे यांनी दिल्या.
यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साखर कारखान्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.
0000
बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करा-सहायक आयुक्त विशाल लोंढे
Date:

