तरुण वयापासूनच पुण्याच्या राजकीय संस्कृतीत मी वाढत गेलो. पुढे शिक्षण मंडळाचा अध्यक्ष, नगरसेवक, पुण्याचा उप महापौर अशी पदे भूषवीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सदैव ‘रोल मॉडेल’ राहिलेत ते अजितदादा पवार! या तरुण तडफदार नेतृत्वास मोठे वलय लाभले. स्पष्टवक्तेपणा, कणखरपणा, अभ्यासू वृत्ती आणि अफाट लोकसंग्रह या जोरावर त्यांचे नेतृत्व खुलत गेले. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज या दैवतांना आदर्श मानून, महाराष्ट्रात शाहू-फुले -आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करीत त्यांनी संपूर्ण
महाराष्ट्रात घरा-घरात आणि मना-मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. स्वतःची कर्तबगार अशी प्रतिमा तयार केली आणि त्यामुळेच लाखो तरुणांचे ते ‘रोल मॉडेल’ बनले!
१९९१ मध्ये बारामतीमधून प्रथम लोकसभेचे ते खासदार बनले. मात्र काही महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीचे आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत बारामतीचे आमदार म्हणून ते निवडून येत आहेत. प्रथम राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी वैभवशाली वाटचाल करताना राज्यातील शेतकरी आणि गरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा उपेक्षित वर्गाच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करीत त्यांनी साऱ्या महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेले.
राज्यातील युवकांना शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविणारे अजितदादा अतिशय दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळेच पारंपरिक शिक्षणाच्या जोडीला व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण देण्यावर त्यांनी सदैव भर दिला. तसेच स्वयंरोजगाराचा मंत्र त्यांनी गावोगावी तरुणांच्या मनात रुजविला. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी अनेक योजना राबविताना त्यांनी ‘शिकलेली स्त्री कुटुंबाचा उद्धार करते’ हा विचार प्रमाण मानला. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे अर्थमंत्रिपद भूषविले. या काळात प्रत्येक वेळी त्यांनी मुलींना चांगले शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था, मुलींसाठी वसतिगृहे, मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्त्या यांसाठी त्यांनी सदैव भरभक्कम आर्थिक तरतूद केली. त्यांचे हे फार मोठे क्रांतिकारक कार्य आहे.
सध्या राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्याचे धोरण अमलात आणताना अशा सुमारे अडीच कोटी महिलांसाठी वार्षिक अंदाजपत्रकात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची कसरत ते कुशलतेने करतात आणि ‘लाडक्या बहिणींसाठी एक रुपयादेखील कमी पडू देणार नाही’ ही स्वतः केलेली घोषणा तंतोतंत सत्यात आणतात. हे केवळ अजितदादाच करू जाणे! अजितदादांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जडलेले भावनिक नाते! महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीवर थाप मारत ते नावाने हाक मारतात, तेव्हा त्यांच्या अफाट लोकसंपर्काचे आणि स्मरणशक्तीचे कौतुक वाटते.
कार्यकर्त्याची छातीदेखील अभिमानाने फुलते. कार्यकर्त्यांना बळ देणे ही तर अजितदादांची खासियत आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण आहे. एखादे काम होणार असेल, तर ते तसे सांगतात. मात्र एखादे काम होणार नसेल, तर स्पष्टपणे ‘नाही’ सांगतात. कोणतेही वेडेवाकडे, बेकायदेशीर काम घेऊन कोणी आले, तर त्याला स्पष्टपणे नकार देणारे अजितदादा त्यामुळेच सर्वांच्या आदरास पात्र ठरले आहेत.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समता या मूल्यांवर अजितदादांची अपार श्रद्धा आहे. सत्ता हे परिवर्तनाचे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी साधन असते, हे ओळखून महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एखाद्या झंझावाताप्रमाणे सकाळी ६ वाजल्यापासून १८-१८ तास ते काम करीत राहतात. प्रशासनावरही त्यांची भक्कम पकड आहे. अजितदादांनी कधी सुट्टी घेतल्याचे कोणालाच ऐकिवात नाही.
पुणे हा अजितदादांचा जिल्हा! पुण्याचे ते पालकमंत्रीदेखील आहेत. पुण्याचा विकास व समतोल वेगाने व्हावा, यावर ते कटाक्षाने लक्ष ठेवतात. पुण्याचा पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक अशा नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञाना देखील ते सहभागी करून घेतात. त्यामुळे पुणे असो अथवा पिंपरी-चिंचवड, या दोन्ही शहरांचा विकास झपाट्याने तर झालाच, शिवाय नागरी प्रश्न वेगाने सुटण्यासही मदत झाली. याबद्दल नागरिक त्यांचे सदैव ऋणी राहतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र गुंफले आहे. राजकीय कामाबरोबरच सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींची ताकद हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे आणि ती केवळ अजितदादांमुळेच! माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा त्यांनी सोपविली होती. तो माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मी मानतो. ‘पक्ष-संघटना मजबूत करीत जनतेचे प्रश्न सोडवीत राहणे, हेच आपले जीवनध्येय आहे, असे मानून काम करीत राहा’ हा त्यांनी त्यावेळी दिलेला संदेश आजही मनाला प्रेरणा देत राहतो. अजितदादांनी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना विकासाची दृष्टी दिली, हे त्यांचे फार मोठे योगदान मी मानतो.
अजितदादांसारख्या धुरंधर नेतृत्वाच्या हाती आपले महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील, ही भावना राज्यातील कानाकोपऱ्यातील जनतेच्या मनात आहे आणि त्यासाठीच अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही अपेक्षा राज्यातील लाखो जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने मी व्यक्त करतो. ज्येष्ठ लोकनेते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे अजितदादांचे राजकीय जीवनातील आदर्श आहेत. त्यांच्या विचारांना प्रणाम मानून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे धुरंदर लोकनेते आदरणीय शरदराव पवार साहेब यांच्या विचारांचा सन्मान करीत व सर्वांना सोबत घेत अजितदादा वाटचाल करीत आहेत. हीच वाटचाल त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाईल हा विश्वास मला आहे.
आपला
दीपक मानकर

