पुणे- नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी पुन्हा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी महापौर आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कळविली आहे. भोसरी गोडाऊन येथे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही मतमोजणी होणार आहे.असेही ते म्हणालेत.
त्यांनी या प्रकरणी सविस्तर कळविले आहे कि,’नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मतदारसंघातून आक्षेप नोंदवण्यात आले होते. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रक्रिये बाबतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी आक्षेप नोंदवत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने हडपसर विधानसभा मतदारसंघातील २७ EVM मशिन्स व VVPAT मशिन्सची पुन्हा मोजणी करण्यास मान्यता दिली होती. मात्र ही मोजणी करताना प्रत्यक्ष निवडणुकीत झालेले मतदान संपूर्णपणे मशीन मधून खोडून, मॉकपोल घेऊन मोजणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयास प्रशांत जगताप यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून येत्या २५ जुलैपासून प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. भोसरी गोडाऊन येथे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही मतमोजणी होणार आहे.याबद्दल प्रशांत जगताप यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत हडपसर विधानसभा मतदारसंघात झालेली मतांची चोरी जगासमोर येणार हा विश्वास व्यक्त केला.

