दिलीपराज प्रकाशनतर्फे ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : पाश्चात्त्य वैज्ञानिक, संशोधकांनी अणुउर्जेसंबंधी संशोधनाचा वापर विद्ध्वंसासाठी केला. अणुबॉम्ब तयार करून अणुउर्जेचे विनाशक रूप जगासमोर आणले. या अणुउर्जेच्या विनाशक आणि महासंहारक शक्तीमुळेच जग आज तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभे आहे. अणुचे विनाशक रूप संशोधित न करता, त्याच्या विधायक वापराचे संशोधन पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि दिलीप बर्वे लिखित ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ या विज्ञानविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका अश्विनी धोंगडे, प्रकाशक मधुर बर्वे तसेच लेखक दिलीप बर्वे मंचावर होते. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे उपस्थित होते.
लेखक दिलीप बर्वे म्हणाले, गोष्टी सांगणे मला शालेय जीवनापासून आवडते. मोठेपणी मी स्लाईड शोच्या माध्यमातून शास्त्रज्ञ, महान व्यक्तिमत्त्वे यांच्या गोष्टी विद्यार्थी तसेच नागरिकांसमोर मांडत गेलो. १९९८ मध्ये आपल्या देशाने जे दोन अणुस्फोट घडवले, त्यांची इत्थंभूत माहिती सर्वांसमोर यावी, हा हेतू ठेवून पुस्तकाचे लेखन केले. तांत्रिक, वैज्ञानिक परिभाषा न वापरता, सोप्या आणि गोष्टीरूपात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, अणुउर्जा हे केवळ शस्त्र नाही, तर त्या उर्जेचे विधायक, मानवाला उपयुक्त असे विनियोग पुढे येण्याची आवश्यकता आहे. लेखक दिलीप बर्वे यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अणु, अणुस्फोटाचा इतिहास, अणुचे विखंडन, त्यासंदर्भातील संशोधन, शास्त्रज्ञांची चरित्रे तसेच अणुउर्जेचे विधायक उपयोग यांची माहिती गोष्टीरूपात वाचकांसमोर आणली आहे. बर्वे यांनी पुस्तकात शास्त्रज्ञांचे संशोधन, चरित्र तसेच माणूसपणही मांडले आहे. विधायक, संवेदनशील, शैलीदार आणि विश्वकल्याणकारी भावना जपणाऱ्यालेखनाची आज गरज आहे.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखक दिलीप बर्वे यांची सर्जनशीलता प्रकट झाली आहे. बर्वे यांचे लेखन गोष्टीरूप असल्याने, अवघड वैज्ञानिक संज्ञा, परिभाषा, अतितांत्रिकता यापासून ते मुक्त आहे. अणुविषयक संशोधन ज्या शास्ज्ञज्ञांनी केले, त्या संशोधनाचे वैज्ञानिक युगातील योगदान नेमके काय आहे, याचे विवेचन लेखकाने या पुस्तकात केले आहे. चरित्रात्मक माहितीतून शास्त्रज्ञांचे काम लेखकाने पुढे आणले आहे. अणुउर्जेच्या वापराबाबतची काळजी कशी घ्यावी आणि अणुउर्जा मानवी कल्याणासाठी कशी वापरता येईल, विश्वशांततेसाठी तिचा वापर कसा करता येईल, याचे मार्गदर्शन लेखकाने केले आहे, ते महत्त्वाचे आहे.
दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी प्रकाशकीय मनोगतात अणुच्या शोधाचे श्रेय प्राचीन भारतातील कणाद यांचे असल्याचा उल्लेख केला. सुदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

