हनीट्रॅपची सिनेसृष्टीतही मोठी चर्चा
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी हनीट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तीचे नाव घेतले आहे. जळगावच्या प्रफुल्ल लोढा नामक कार्यकर्त्याकडे हनीट्रॅपची संपूर्ण माहिती आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत.
राज्यात सध्या हनीट्रॅपच्या कथित प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय गोटात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी काही आजी-माजी मंत्री तथा उच्चपदस्थ अधिकारी अडकल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीला हनीट्रॅपची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या कालखंडात अनेक ठिकाणी हनीट्रॅपची प्रकरणे उजेडात येत आहेत. नाशिक येथील एक प्रकरणही नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात 72 अधिकारी अडकल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुर आहे.
दुसरे प्रकरण प्रफुल्ल लोढा नामक जळगावच्या माणसाचे आहे. हा व्यक्ती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याविरोधात अंधेरी व साकिनाका या 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, त्यांना छळणे, ब्लॅकमेल करण्याचा आहे. तर दुसरा गुन्हा हा हनीट्रॅपचा आहे. प्रफुल्ल लोढा हा पूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता. अगोदर तो काँग्रेसमध्ये होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. नंतर त्याने भाजपत प्रवेश केला. त्याच्या प्रवेश सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री कार्यालयाचे रामेश्वर नाईकही उपस्थित होते.
एक बटण दाबले की…
प्रफुल्ल लोढा, गिरीश महाजन व रामेश्वर नाईक या तिघांचे पूर्वी खूप चांगले संबंध होते. पण गतवर्षी लोढाने रामेश्वर नाईक व गिरीश महाजन यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली. त्यांचे चांगले संबंध अचानक का खराब झाले? असा सवाल उपस्थित होतो. याच प्रफुल्ल लोढाने एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत त्याने, एक बटण दाबले की, संपूर्ण देशात हाहाकार माजेल. पण मी कुणाला तरी आई व वहिनी बोललो आहे, असे म्हटले होते, असे खडसे म्हणाले.
या प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडिओ आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असेही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोढा यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात प्रफुल लोढा ‘मला पुरावे देण्याची गरज नाही, मला फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे’, असे म्हणत थेट इशारा दिल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रफुल लोढा म्हणतात, मी 2 तारखेला जामनेर पोलिस स्टेशन, एसपी ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, माझे स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी. कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे, यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळेच माझ्या जीवाला धोका आहे. मला 31 जुलै (2024) रोजी स्वतःला बालब्रह्मचारी म्हणवणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती प्रफुल लोढा यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या मोबाइलवर आलेले कॉल पण दाखवला.
पुढे बोलताना प्रफुल लोढा म्हणाले, गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की जर काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिस स्टेशनला द्यावे. मला पुरावे पोलिस स्टेशनमध्ये देण्याची गरज नाही. मला फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे. परंतु, मी एक मनुष्य आहे आणि कोणाला वहिनी म्हटले आहे, कोणाला आई म्हटले आहे, कोणाला मुलगी म्हटले आहे. त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे. परंतु, ज्या दिवशी यांचे शंभर पाप पूर्ण होतील, मला त्या दिवशी आपल्या सगळ्यांची गरज लागणार नाही, असे प्रफुल लोढा यांनी यात म्हटले आहे.

