पुणे: दिव्यांग, विधवा महिला, निराधार आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने अन्नधान्य योजनेचा लाभ द्यावा, अशी सूचना वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिल्या.
वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची (ता. २१) येरवडा ई झोन येथे अन्नधान्य वितरण कार्यालय व परिमंडळ कार्यालय अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मतदारसंघातील अन्नधान्य वितरणाची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या तसेच विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वेळेवर व नियमानुसार धान्य मिळते का, याचीही चौकशी आमदार पठारे यांनी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार पठारे यांनी स्पष्ट सूचना दिल्या, की “शिधापत्रिका प्रक्रियेमध्ये कुठल्याही एजंटमार्फत होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती यांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत प्रशासनाने तातडीने करावी.”
शिधापत्रिकेसंबंधित कोणतेही काम करण्यासाठी शासनाने विकसित केलेली https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित व्यक्तीने स्वतः अर्ज करावा आणि आपले काम निशुल्क करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागणार नाही किंवा कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट मार्फत करू नये त्यांना या कामासाठी पैसे देऊ नये असे आवाहनही यावेळी केले.
ऑनलाइन कामांमध्ये कोणतीही अडचण आल्यास संबंधित व्यक्तीने परिमंडल कार्यालयात जाऊन परिमंडल अधिकारी व इतर कोणीही शासकीय अधिकारी असेल त्यांच्याकडून या कामाचा निपटारा करून घ्यावा आणि अधिकाऱ्याने ते प्राधान्याने करून द्यावे याबाबतच्या सूचनाही पठारे यांच्याकडून देण्यात आल्या.
बैठकीला येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर अशोक भवारी, अन्नधान्य वितरण झोनल अधिकारी चांगदेव नागरगोजे, विविध अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत अन्नधान्य वितरणाबाबत प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सुधारणेसंबंधी निर्णय घेण्यात आले.

