11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6:24 वाजता मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे मार्गावर पहिला स्फोट झाला. तेव्हा लोकल ट्रेनमध्ये कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. एकामागून एक माटुंगा रोड, वांद्रे, खार रोड, माहिम जंक्शन, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली स्थानकांजवळ सात स्फोट झाले. प्रत्येक स्फोटामध्ये 1 ते 2 मिनिटांचे अंतर होते. संपूर्ण परिसरात आरडाओरड, गोंधळ, आणि मृतदेहांचा सडा पडला होता. सर्वात भीषण स्फोट माहिम स्थानकावर झाला, याठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले.
स्फोटात कोणत्या स्थानकावर किती मृत्यू झाले?
चर्चगेट-बोरीवली लोकल: 43 मृत्यू
मीरा रोड-भाईंदर लोकल: 31 मृत्यू
चर्चगेट-विरार लोकल: 28 मृत्यू
चर्चगेट-बोरीवली लोकल: 28 मृत्यू
चर्चगेट-विरार (बोरीवली) लोकल: 26 मृत्यू
चर्चगेट-बोरीवली (वांद्रे-खार रोड) लोकल: 22 मृत्यू
चर्चगेट लोकल : 9 मृत्यू
बॉम्बस्फोटांची टाइमलाईन
पहिला स्फोट – 6:24 वाजता
दुसरा स्फोट – 6:24 वाजता
तिसरा स्फोट – 6:25 वाजता
चौथा स्फोट – 6:26 वाजता
पाचवा स्फोट – 6:29 वाजता
सहावा स्फोट – 6:30 वाजता
सातवा स्फोट – 6:35 वाजता
बॉम्बस्फोटासाठी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर
या स्फोटांसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. हे सर्व बॉम्ब लोकल रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये ठेवण्यात आले होते. बॉम्बस्फोटानंतर कोचचे तुकडे झाले होते. स्फोटासाठी चर्चगेटहून लांबच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले कारण या ट्रेनमध्ये घराकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने घेतली होती.
गुजरातमधील हिंसाचाराचा बदला म्हणून घडवले स्फोट?
अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या या सात शक्तिशाली स्फोटांनी मायानगरी हादरुन गेली होती. या स्फोटांनंतर मुंबईतील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर झालेल्या तपासणीत काही स्फोट न झालेले कुकर बॉम्ब मिळाले होते. या शक्तिशाली स्फोटांमुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले होते. या स्फोटांनंतर मुंबईतील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने जखमींना आणले जात होते. बहुतांश बॉम्ब हे चर्चगेटवरुन सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूड म्हणून मुंबईतील गुजराती नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने हे स्फोट घडवून आणल्याची एक थिअरी तपासादरम्यान समोर आली होती.

