नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज सध्या तहकूब करण्यात आले आहे.राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना मारलेही गेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे उपराज्यपालांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी २४ वेळा सांगितले आहे की आम्ही युद्ध थांबवले. सरकारने या सर्वांचे उत्तर द्यावे.
यादरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले – देशात असा संदेश जाऊ नये की सरकार पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू इच्छित नाही. आम्ही चर्चा करू आणि ते सर्व प्रकारे करू. ऑपरेशन सिंदूरचे सर्व मुद्दे देशासमोर ठेवले जातील.
तत्पूर्वी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले – प्रश्नोत्तराच्या तासानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. ही पद्धत योग्य नाही. पहिल्याच दिवशी हे वर्तन योग्य नाही. आपण हा गैरसमज मोडला पाहिजे.पावसाळी अधिवेशनापूर्वी, I.N.D.I.A. आघाडीची बैठक झाली. यामध्ये ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरे हवी होती.

