नवी दिल्ली-राज्यातील चार मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात खोटे बोलत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देखील अशाच हनीट्रॅपचा वापर करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. या आधीचे सरकार हे घटनाबाह्य होते, तर आताचे सरकार हे अनैतिक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकार हे राज्याला कलंकित करणारे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार नाही तर गुंडाची टोळी काम असल्याचे राऊत यांनी म्हटल आहे. महाराष्ट्राने इतका हतबल मुख्यमंत्री कधीही पाहिला नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अशाच हनीट्रॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले होते, असा दावा राऊत यांनी केला होता. या आधी देखील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला होता. मात्र, त्याची खरी सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अशाच हनीट्रॅप प्रकरणात अडकून आमचे नेते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
आमचे चार तरुण खासदार देखील अशाच हनीट्रॅप मध्ये अडकून तिकडे गेले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. चार तरुण खासदार आमच्याकडून हनीट्रॅप प्रकरणामुळे त्यांच्याकडे पळून गेले. तर काही सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणा आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे गेले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा कोणाचाही हिंदुत्वाशी काही संबंध नाही. अजित पवार यांचा देखील सामाजिक न्याय, फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार, असा काहीही संबंध नाही. त्यांची पळून जाण्याची कारणे फार वेगळी आहेत, असा दावा राऊत यांनी केला. या अशा अनेक हनीट्रॅपच्या सीडी आणि पेन ड्राइव्ह यांच्या माध्यमातूनच चौथ्या दिवशी सरकारमधील नेते पळून सुरत मार्ग गुवाहाटीला पोहोचले होते. असा दावा त्यांनी केला. सीडी बाहेर येईल म्हणूनच पटापट सगळे सुरतला रवाना झाले होते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नाव फडणवीस असले तरी त्यांच्या अंतरंगात, मनामध्ये जो संस्कार असायला पाहिजे, तो दिसत नाही. आमदार निवासामध्ये हाणामारी होत आहेत, संजय शिरसाट यांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा सर्वांनीच पाहिल्या आहेत, मंत्री रम्मी खेळत आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांचे समर्थन करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काही मुख्यमंत्री अकार्यक्षम होऊन गेले असतील. त्यांच्याकडून काही चुका देखील झाल्या असतील. मात्र भ्रष्टाचार, व्यभिचार, मंत्रिमंडळातील गुंडागर्दी आजपर्यंत कोणीही पाहिली नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आज काय चालू आहे हे राज्याचे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो मी आज पोस्ट केला आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात अगदी पुराव्यासह एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत. हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे. म्हणूनच त्याचा पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलिस जंग-जंग पछाडत असल्याचा दावा त्यांनी केला. आज देखील पोलिसांनी पाच ठिकाणी धाडी टाकल्या असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील राऊत यांनी दाखवला.

