पुणे-पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव,पुणे) असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंड याठिकाणी गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले देखील आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी यबाबत घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

