मुंबई-विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आशा नुकतीच व्यक्त केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना भविष्यात सोबत घेण्याबाबत त्यांनी नेताजी पालकरांचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
अंबादास दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या भवितव्यावर भाष्य करत अनेक राजकीय संकेत दिले आहेत. आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली, याची सल मनात कायम राहते. मात्र, आता शिवसेना म्हणून पुन्हा एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे? असे विधान त्यांनी नुकतेच केले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे भविष्यात सोबत आल्याने त्यांना गद्दार म्हणणार का? असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी नेताजी पालकरांचा दाखला देत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून स्वराज्यात घेतले होते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना भविष्यात सोबत घेण्याबाबत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून स्वराज्यात घेतले होते, यावर मी एवढेच बोलेल, असे सूचक सूचक विधान अंबादास दानवे यांनी केले.अंबादास दानवे पुढे म्हणाले, शिवसेनेबाबत आजही वेदना होतात. रक्ताने जोडलेले लोक जेव्हा विरोधात जातात, तेव्हा वेदना होणे साहजिक आहे. एकनाथ शिंदे यांनाही आतून काहीतरी जाणवत असावे, असे मला वाटते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य भेटीबाबत प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, आम्ही भाजपला उघडपणे भेटलो आहोत. आम्ही शत्रू नाही, विरोधक आहोत. आमच्यात विचारांची लढाई आहे. त्यामध्ये काही सुरू आहे, असे आम्हाला वाटत नाही.

