मुंबई- भाजपचे कार्यकर्ते आणि एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आरोग्यदूत म्हणून कार्यरत असलेले प्रफुल लोढा यांच्याविरोधात मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत आणि हनीट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना जोर आला आहे. सध्या राज्यभरात हनीट्रॅप प्रकरण गाजत असून, त्याची पाळेमुळे नाशिक आणि जळगावपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथील व्यापारी प्रफुल लोढा हे मुंबईतील चकाला परिसरातील लोढा हाऊस या निवासस्थानी एका अल्पवयीन मुलीसोबत आढळून आले होते. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी संबंधित मुलीवर कथितरीत्या अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील अंधेरी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये लोढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 5 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर पहूर येथील त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असून, काही महत्वाचे दस्तऐवज आणि वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपमध्ये अनेक वर्ष सक्रिय राहिल्यानंतर, मागील विधानसभा निवडणुकीत प्रफुल लोढा यांनी पक्षाला रामराम करत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्याआधीच माघार घेतली. काही काळ भाजपापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षात पुनर्प्रवेश केला, मात्र त्यांना कोणतेही जबाबदारीचे पद देण्यात आले नव्हते.
प्रफुल लोढा हे सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे आणि वर्तणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. सध्या ते भाजपात असले तरी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र आता त्यांच्यावर मुंबईमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
प्रफुल लोढा हे एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालांतराने त्यांनी त्या नेत्यावरच गंभीर आरोप करत त्यांच्यापासून फारकत घेतली. त्यानंतर लोढा यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक 2024 साठी त्यांना वंचितकडून उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, केवळ पाच दिवसातच त्यांनी उमेदवारीमधून माघार घेतली.
कथित समाजसेवक आणि ‘आरोग्यदूत’ म्हणून एक काळी ओळख निर्माण केलेल्या प्रफुल लोढा यांच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ते वेळोवेळी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या हालचालींवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सतत लक्ष ठेवले जात आहे.

