विद्यार्थी, पालक, शाळा समिती सदस्य व योगदानकर्त्यांचा सत्कार .
पुणे, – प्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर, येथे शैक्षणिक वर्ष 2024–25 ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी शाळेचे व्हिजिटर सतीश लिंबेकर कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी कु. दीप्ती पानसरे व सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार साहेब उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी शिक्षणातील मूल्य, पालक-शाळा संबंध आणि सामाजिक सहभाग यावर प्रकाश टाकला.
सभेच्या निमित्ताने वर्षभर शैक्षणिक, क्रीडा, कला व इतर उपक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या पालकांचाही सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी नवीन शाळा समितीचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले, तर मावळत्या समिती सदस्यांचा यथोचित सन्मान व निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी मागील वर्षभरात शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींना खास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. क्लेरा काळे यांनी ओघवत्या शैलीत पार पाडले.
मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना महाजन यांनी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील वर्षातही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

