पुणे: “आयुर्वेदासारख्या प्राचीन व पारंपरिक ज्ञानाला संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी. आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून ज्ञान, कौशल्ये आत्मसात करावीत. सतत शिकण्याची वृत्ती, सकारात्मक मानसिकता, कठोर परिश्रम, नेतृत्वक्षमता आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव यामुळे आपले जीवन अधिक समृद्ध होते,” असे प्रतिपादन पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले.
प्राचीन संहिता गुरुकुल आयोजित ‘दिग्गजांच्या मुलाखती’ उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आयुर्वेद अध्यापन व संशोधन संस्थेच्या संचालक वैद्य तनुजा नेसरी व पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी संवाद कार्यक्रम रंगला. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी वैद्य हरिश पाटणकर, वैद्य स्नेहल पाटणकर, बाळराजे खर्डेकर, सुरेश मोहिते, नीता मोहिते, अजय फराटे, धीरेंद्रराजे खर्डेकर, सिध्दसेनराजे खर्डेकर, वैद्य विनेश नगरे, वैद्य संतोष सूर्यवंशी, वैद्य सुहास हेर्लेकर, वैद्य योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद आणि कायायुर्वेद परिवाराच्या नवीन संस्थेच्या वास्तूचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. वैद्य हरीश पाटणकर लिखित ‘द ब्रह्मा कोड’ या पुस्तकाचे, वैद्य पाटणकर संशोधित व निर्मित ट्रायरेज हेअर ऑइलचे, इंडियन नॉलेज सिस्टीम ऑलिम्पियाडचे अनावरण झाले. ‘गुरुकुल’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व वैद्य तनुजा नेसरी यांना ‘आचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्य विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.
रंजनकुमार शर्मा म्हणाले, “प्राचीन ज्ञान व परंपरा जगभर पोहोचण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्रत्येकाने चांगले काम करण्याचा, नकारात्मक परिस्थितीवर मात करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकत्रित कुटुंबपद्धती, परस्परांतील संवाद ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. गॅजेट्समुळे अलीकडे कुटुंब विभक्त होताहेत. संवाद हरवला आहे. अशावेळी संवादाने एकमेकांना जोडण्याचे, समजून घेत साथ देण्याचे प्रयत्न व्हावेत.”
सौरभ राव म्हणाले, “गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळे मूल्याधिष्ठित नेतृत्व तयार होऊ शकते. सध्याच्या काळात केवळ ज्ञानापेक्षा अनुभव, मूल्ये आणि जीवनकौशल्ये अधिक महत्त्वाची ठरत आहेत. आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करताना या सर्व गोष्टींचे महत्त्व अधिक आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासामध्येही शास्त्रीय चिकित्सा, परंपरा आणि जीवनपद्धती यांचा समन्वय आवश्यक आहे. आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नाही, तर संपूर्ण जीवनशैलीचे विज्ञान आहे.”
वैद्य तनुजा नेसरी म्हणाल्या, “आयुर्वेद हे केवळ उपचारपद्धती नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. आधुनिक काळात आयुर्वेदाची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा महत्त्वाची ओळख निर्माण होत आहे, आणि यामागे भारतातील गुरुकुल परंपरेचा मोलाचा वाटा आहे. भारतीय आयुर्वेद प्रणाली ही विज्ञानावर आधारित असून तिचा उगम ऋषीपरंपरेत आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणारी ही चिकित्सा जगभर लोकस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरत आहे.”
वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, “प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद व कायायुर्वेद भारतीय परंपरेला, आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला आयुर्वेदाची विविध अंगे समजावीत, समाजात सकारात्मकता पसरवण्यासाठी कार्यरत दिग्गजांना ऐकता यावे, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.”
शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव व्हावा
“आज जग आयुर्वेदाकडे पर्याय म्हणून नव्हे, तर प्राथमिक आरोग्य व्यवस्थेसाठी बघत आहे. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचे सखोल अध्ययन करताना संशोधन आणि नवोन्मेष याकडेही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला घराघरात पोहोचवायचे असेल, तर आपल्याला शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव करायला हवा. त्यातूनच सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून, सातत्याने अद्ययावतीकरण, स्वीकार्हता, आणि क्षमतावृद्धी या गोष्टी आत्मसात केल्या, तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडेल,” असेही वैद्य नेसरी यांनी नमूद केले.

